समाजवादी पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर रामचरितमानस वाद पुन्हा भडकला आहे. ते म्हणाले की, रामचरितमानसमधील बराचसा भाग महिला, आदिवासी, अनुसूचित जाती आणि दलितांसाठी अपमानजनक आहे. यानंतर सत्ताधारी भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र समाजवादी पार्टी मात्र मौर्य यांच्या पाठीशी ठाण उभी आहे.
गेल्या महिन्यात स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वदग्रस्त वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशमधलं वातावरण तापलं होतं. असं असलं तरी सपाने त्यांना काहीच दिवसात पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती दिली आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी मौर्य यांनी भाजपाला रामराम करून सपामध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, लखनौमधील एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात बुधवारी मौर्य आणि त्यांचे समर्थक तसेच अयोध्येतील महंत राजू दास (रामचरितमानसवर मौर्य यांनी केलेल्या केलेल्या टिप्पणीबद्दल सपा नेते मोर्य यांचं मुंडकं छाटून आणणाऱ्या व्यक्तीला २१ लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा करणारे राजू दास) यांचे अनुयायी एकमेकांशी भांडले. यावेळी मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या.
हे ही वाचा >> आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीला तेलंगणात तीन महिन्यांत तिसऱ्यांदा अटक; काय आहे कारण?
ओबीसी समुदायाला सामावून घेण्याचा प्रयत्न?
समाजवादी पक्ष हा मुस्लीम आणि यादवांच्या मतांवर अवलंबून आहे. परंतु आता पक्षाला त्यांच्या कक्षा रुंदावायच्या आहेत. त्यामुळे हा पक्ष ओबीसी आणि दलित समुदायाला सामावून घेऊ पाहतोय. तसेच यांना भाजपापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी १११ जागा जिंकल्या होत्या. तर भारतीय जनता पार्टीने २५५ जागा जिंकत उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली होती.