ऋषिकेश बामणे
क्रिकेटचा विश्वचषक म्हटला की मैदानातील घडामोडींव्यतिरिक्त मैदानाबाहेर रंगणाऱ्या वादग्रस्त प्रकरणांविषयीसुद्धा क्रीडाप्रेमींमध्ये अधिक चर्चा रंगते. इंग्लंडला सुरू असलेल्या यंदाच्या विश्वचषकातही आतापर्यंत चार घटनांमुळे स्पर्धेला गालबोट लागले असले, तरी यापूर्वीच्या विश्वचषकांमध्ये काही धक्कादायक व आश्चर्यचकित करणारे अनेक प्रसंग घडले आहेत.
१६ जून रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचे काही खेळाडू ‘शिशा’ क्लबमध्ये पार्टी करतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षांव करून त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी केली. याचप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानचे काही खेळाडू आणि चाहत्यांमध्ये ‘अकबर’ बारमध्ये झालेल्या चकमकीचे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते.
ताजे उदाहरण म्हटले तर गेल्या शनिवारी झालेल्या भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्यात मैदानावर फिरणारे भारताविरोधी फलक चर्चेचा विषय ठरले. विमानाला लावण्यात आलेल्या त्या फलकांवर ‘काश्मीरमुक्त भारत’, ‘काश्मीरसाठी न्याय’ असा मजकूर होता. त्यामुळे क्रिकेटला पुन्हा एकदा राजकीय आणि देशांतर्गत संबंधांचा फटका बसला. त्याचप्रमाणे न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात एका चाहत्याने नग्नावस्थेत भर मैदानात धाव घेतल्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेवर आणि आयोजकांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
क्रिकेटच्या इतिहासाची पाने चाळल्यास २००३च्या विश्वचषकादरम्यान रॉबर्ट मुगाबे यांच्या राजवटीमुळे झिम्बाब्वेत राजकीय अस्थिरता निर्माण होऊन मोर्चे, जाळपोळ असे बंडाचे वातावरण सुरू होते. त्यामुळे इंग्लंड, न्यूझीलंड संघांनी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यांतून माघार घेतली. झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा यांनीसुद्धा संपूर्ण विश्वचषकादरम्यान मुगाबेच्या साम्राज्याचा विरोध करत दंडावर काळी फीत बांधली आणि विश्वचषकानंतर निवृत्तीसुद्धा पत्करली. त्याचप्रमाणे १९९६च्या विश्वचषकापूर्वी श्रीलंकेत दहशतवादी हल्ल्यात एक हजारहून अधिक नागरिकांचा बळी गेल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांनीसुद्धा श्रीलंकेत जाण्यास नकार दिला होता.
२००३चा विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नला निलंबित करण्यात आले. मॉडय़ुरेटिक नावाच्या द्रव्याचे (ड्रग्ज) सेवन केल्यामुळे वॉर्नवर बंदी घालण्यात आली होती. परंतु हे द्रव्य वॉर्नला रोगप्रतिकारकक्षमता वाढवून त्याची शरीरयष्टी सुधारण्यासाठी त्याच्या आईनेच दिले असल्याचे विश्वचषकानंतर उघडकीस आले.
२००७च्या विश्वचषकात आर्यलडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान पराभूत झाल्यामुळे त्यांच्यावर साखळी फेरीतूनच स्पर्धेतून गाशा गुंडाळण्याची वेळ आली. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच वेस्ट इंडिजच्या जमैका पैगसस हॉटेलमध्ये पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा मृतदेह आढळल्यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ माजली. बरीच वर्षे चौकशी करूनही या हत्येमागे कोणाचा हात आहे, हे स्पष्ट झालेले नाही. परंतु जमैकातील वैद्यकीय आढाव्यानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे समजते. संघाच्या सुमार कामगिरीला मनाला लावून घेणारे चाहते अथवा संघातीलच खेळाडू किंवा अन्य सहकाऱ्यांपैकी कोणी तरी त्यांची हत्या केली असावी, अशी चर्चासुद्धा त्या वेळी रंगली होती.
विजेत्या भारताला विश्वचषकाची प्रतिकृती?
२०११मध्ये विश्वविजेत्या भारताला खरा विश्वचषक देण्याऐवजी त्याची प्रतिकृती देण्यात आल्याचे उघडकीस आल्यामुळे क्रीडाविश्वाला जबर धक्का बसला. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी विश्वचषक कोलंबोला नेण्यात आला होता. परंतु तेथून अंतिम फेरीसाठी मुंबईत नेताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्या चषकाचा आयात कर न भरल्यामुळे सीमाशुल्क विभागाने चषक जप्त केला. परंतु ‘आयसीसी’ने सर्व अफवांना धुडकावून लावत भारताला दिलेला चषकच खरा असून त्यावर २०११च्या विश्वचषकाचे बोधचिन्हसुद्धा आहे, असे स्पष्ट केले. त्याशिवाय सीमाशुल्क विभागानेही जप्त केलेला चषक हा प्रदर्शनीय असल्याचे सांगितले. मात्र प्रदर्शनीय चषकाचा ६० लाख रुपये इतका आयात कर कसा? ही रक्कम भरण्याची ‘आयसीसी’ची कुवत नाही का? असे अनेक प्रश्न त्या वेळी उपस्थित करण्यात आले. त्याचप्रमाणे भारताला देण्यात आलेल्या चषकावर माजी विजेत्या संघांची नावेही नसल्यामुळे ‘आयसीसी’वर टीका करण्यात आली. त्यामुळे २०१५ पासून चषकावर माजी विजेत्यांची नावे नसली तरी त्या विश्वचषकाचे खास बोधचिन्ह नक्की असेल, याची खात्री ‘आयसीसी’ने बाळगली.
ईडन गार्डन्सवर जाळपोळ
१९९६च्या विश्वचषकातील कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेला भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना आजवरच्या भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जातो. या सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ८ बाद १२० धावा अशी ढेपाळली. भारताचा पराभव दिसू लागल्यावर स्टेडियममधील संतप्त चाहत्यांनी जाळपोळ करत मैदानावर पाण्याच्या बाटल्यांचा भडिमार केला. चाहत्यांच्या रोषाला आवरणे अशक्य झाल्यामुळे सामनाधिकारी क्लाइव्ह लॉइड यांनी सामना रद्द करून श्रीलंकेला विजयी घोषित केले.