प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिमी आणि इंडिजन मुजाहिदीनचा दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल सुभान कुरेशी असे या दहशतवाद्याचे नाव असून भारतीय सुरक्षा यंत्रणा अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होत्या. एनआयने त्याच्यावर चार लाखांचे इनामही घोषित केले होते. अब्दुल कुरेशीने पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतरच्या काळात तो सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. या काळात अब्दुल कुरेशी बॉम्ब तयार करण्याचा तज्ज्ञ म्हणून ओळखला जात होता. मुंबईचा रहिवाशी असणारा अब्दुल कुरेशी हा उच्चशिक्षित असून त्याने भारतातील अनेक बॉम्बस्फोटांमध्ये मास्टरमाईंड म्हणून भूमिका पार पाडली होती.
अब्दुल कुरेशी शनिवारी एका व्यक्तीला भेटायला दिल्लीतील राजापुरी परिसरात आला होता. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अब्दुल कुरेशीने त्याच्याजवळील पिस्तुलामधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर काहीवेळ दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. मात्र, पोलिसांनी अब्दुल कुरेशीला जिवंत पकडण्यात यश मिळवले. अब्दुल कुरेशीने भारताच्या अनेक भागांत दहशतवादाचे जाळे पसरले होते. याशिवाय, तो इंडियन मुजाहिदीनचा सर्वेसर्वा रियाज भटकळच्या जवळच्या वर्तुळातील होता. देशातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामुळे अब्दुल कुरेशीची अटक भारतीय सुरक्षा यंत्रणांच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे.
अब्दुल कुरेशी हा येत्या काही दिवसांत दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट आखत होता. मात्र, त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अब्दुल कुरेशीला बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांकडून थोड्यावेळात यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला अब्दुल कुरेशी हा २००८ साली गुजरात आणि दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटातही सहभागी होता.
We have arrested India most wanted terrorist Abdul Subhan Qureshi who is also the founder of Indian Mujahideen. He was again trying to revive Indian Mujahideen: DCP Pramod Kushwaha, Special Cell #Delhi pic.twitter.com/lAemT8b7Er
— ANI (@ANI) January 22, 2018
Abdul Subhan Qureshi was living with forged documents in Nepal. He came back to India to revive Indian Mujahideen: DCP Pramod Kushwaha, Special Cell #Delhi pic.twitter.com/lSigZRk4FY
— ANI (@ANI) January 22, 2018
Special Cell of Police arrested Abdul Subhan Qureshi of SIMI-IM arrested after a brief exchange of fire. He was involved in 2008 serial blasts in Gujarat. #Delhi
— ANI (@ANI) January 22, 2018
गुप्तचर खात्याने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात नुकताच हाय अलर्ट जारी केला होता. काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला अटक केली होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था असते. परंतु, दिल्लीतील जामा मशिद परिसरात तीन संशयित दहशतवादी लपले असून ते प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली होती. काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला कोणतीही वाईट घटना घडू नये यादृष्टीने हा हाय अलर्ट देण्यात आला होता. तेव्हापासून दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणाही या घटनेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.