स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविड याची साक्ष गेल्या आठवड्यात नोंदविली. राजस्थान रॉयल्स संघातील एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यावर आयपीएलच्या सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. या तिघांनी आपल्या गोलंदाजीतील काही षटके ही अगोदरच ‘फिक्स’ केली होती. या तिघांच्या गोलंदाजीबद्दल राहुल द्रविड याचे मत या साक्षीदरम्यान नोंदविण्यात आले. या खटल्यात राहुल द्रविड याला सरकारी पक्षाचा साक्षीदार केले जाऊ शकते.
दंडविधान संहितेतील कलम १६१ नुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकाऱयांनी गेल्या आठवड्यात राहुल द्रविडच्या निवासस्थानी त्याची साक्ष नोंदविली. राजस्थान रॉयल्समधील इतरही काही खेळाडूंची साक्ष दिल्ली पोलिसांनी नोंदविली. या प्रकरणात जुलै महिन्याच्या अखेरिस आरोपपत्र दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने दिल्ली पोलिस अधिकाधिक पुरावे जमविण्याच्या तयारीत आहे.