पहिला प्रस्ताव फेटाळल्यानंतर भारतातील औषध नियंत्रकांनी डॉ. रेड्डी लॅबला ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या मानवी चाचण्या करायला परवानगी दिली आहे. ‘स्पुटनिक व्ही’ रशियन लस आहे. जगात अधिकृत मान्यता देण्यात आलेली ही पहिली लस आहे. ऑगस्ट महिन्यातच रशियाने मानवी वापरासाठी या लशीला मंजुरी दिली होती.

“वेगवेळया केंद्रांवर आणि रँडम नियंत्रण परीक्षण पद्धतीने ही चाचणी करण्यात येईल. लस मानवी शरीरासाठी सुरक्षित आहे का? आणि रोगप्रतिकारक शक्तीला कितपत चालना मिळते ते, यामध्ये तपासले जाईल” असे डॉ. रेड्डी लॅब आणि आरडीआयएफच्या संयुक्त निवेदना म्हटले आहे.

डिसेंबरमध्ये पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडे लशीचे सहा ते सात कोटी डोस असतील तयार

या लशीची नोंदणी करण्याआधी रशियामध्ये फार कमी जणांवर या लशीची चाचणी करण्यात आली होती. डॉ. रेड्डी लॅबने सुरुवातीला भारतातील मोठया लोकसंख्येवर या लशीची चाचणी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण डीसीजीआयने त्यावर प्रश्न उपस्थित केले. आता नोंदणीनंतर स्पुटनिक व्ही ची रशियात तिसऱ्या फेजची ४० हजार लोकांवर चाचणी सुरु आहे.

सप्टेंबर महिन्यात डॉ. रेड्डी लॅब आणि आरडीआयएफने स्पुटनिक व्ही लशीची भारतातील चाचणी आणि वितरणासाठी भागीदारी केली. या करारातंर्गत भारताला स्पुटनिक व्ही चे १० कोटी डोस मिळणार आहेत. गमालेया संशोधन संस्थेने ही लस विकसित केली आहे.

रशियाच्या या लशीवर जगभरातून बरीच टीका झाली होती. कारण तिसऱ्या फेज आधीच या लशीला मान्यता देण्यात आली होती.१०० पेक्षा कमी जणांवर लशीची चाचणी केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस रशियात उपलब्ध करुन देण्यात आली. पुरेशा चाचणीअभावी ही लस हानीकारक ठरु शकते असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत होते. काही दिवसांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते.