श्रीलंकेमध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांमधील एकाने इंग्लंड व ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेतले होते हे स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये तीन चर्च व तीन हॉटेलमध्ये ईस्टर संडेला झालेल्या बाँबस्फोटांमध्ये 359 जणांनी प्राण गमावले तर 500च्या वर नागरिक जखमी झाले. दहशतवादी सुशिक्षित होते, चांगल्या आर्थिक स्थितीतील होते व त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध होते असे श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. या बाँबस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटनं घेतली.

“आमच्या माहितीप्रमाणे आत्मघातकी दहशतवाद्यांपैकी एकजण इंग्लंडमध्ये शिकायला होता, ज्यानं नंतर पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियामध्ये घेतलं व श्रीलंकेमध्ये तो आला,” रूवान विजयवर्धने यांनी सांगितल्याचे वृत्त गार्डियननं दिलं आहे. या हल्ल्यातील अनेक आत्मघातकी हल्लेखोरांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंध होते, ते एकतर विदेशात रहायला होते किंवा शिकायला होते, असे विजयवर्धने यांनी सांगितले.

“या आत्मघातकी पथकामधील अनेकजण सुशिक्षित होते, तसेच ते मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. त्यामुळे आर्थिकृष्ट्या सुस्थितीतील गटातील हे दहशतवादी होते. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. अनेक दहशतवाद्यांनी विदेशात पदव्या घेतल्यात काहींनी तर कायद्यामध्ये मास्टर्सची पदवी घेतली आहे, त्यामुळे हे सगळे सुशिक्षित होते असं म्हणता येईल,” विजयवर्धने म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या हल्ल्याप्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आणि एकूण ताब्यात घेतलेल्या संशयितांची संख्या 58 आहे. अनेक दहशतवादी स्फोटक साहित्यासह लपून बसलेले असावेत अशी भीती श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी व्यक्त केली आहे. तपास पथकातील काही अधिकाऱ्यांच्या तपासानुसार सदर आत्मघातकी हल्ला घडवणाऱ्या पथकातील 9 जण फरार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही जणांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील परिस्थितीवर आम्ही संपूर्णपणे नियंत्रण मिळवू असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.