भारताला काश्मीर मुद्द्यावरुन कोंडीत पकडण्याचा पाकिस्तानचा डाव पाकिस्तानवरच उलटला आहे. पाकिस्तानने काश्मीरमुद्द्यावरुन श्रीलंकेचा संदर्भ घेऊन केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात श्रीलंकेने एक पत्रक जारी केले असून ‘श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन पाकिस्तानचे समर्थन केलेले नाही,’ असं स्पष्ट केलं आहे. जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भूभाग असल्याचा दावा श्रीलंकन राष्ट्रपतींने केल्याचा पाकिस्तानने केलेला दावा निव्वळ खोटारडेपणा असल्याचं श्रीलंकेने म्हटलं आहे.
श्रीलंकेतील पाकिस्तानचे उच्चायुक्तांच्या विनंतीनंतर राष्ट्रतींनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी जम्मू काश्मीरबद्दलची आपली बाजू स्पष्ट केली. त्यावेळी राष्ट्रपतींनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे श्रीलंकेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे म्हटले होते. या व्यतिरिक्त राष्ट्रपतींने काश्मीर मुद्द्यावरुन भारत पाकिस्तानबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही असं श्रीलंकेने स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानने काय दावा केला होता
पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानने एक पत्रक जारी केले होते. सिरिसेना यांनी जम्मू काश्मीर हा वादग्रस्त भूभाग असून या संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार काश्मीरींच्या मताप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे असे मत व्यक्त केल्याचे या पत्रकात म्हटले होते. “सार्क परिषदेमध्ये काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारत पाकिस्तानमध्ये श्रीलंका मध्यस्थी करायला तयार असल्याचेही त्यांनी सांगितले,” असा दावा पाकिस्तानने या पत्रकामध्ये केला होता. मात्र आता श्रीलंकेने राष्ट्रपतींने दोन्ही देश चांगले मित्र असल्याच्या वक्तव्याशिवाय इतर कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.