श्रीलंकेत निर्माण झालेल्या राजकीय संकटातून मार्ग निघण्याची चिन्हे दिसत नसून दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. गुरुवारी श्रीलंकेच्या संसदेमध्ये अत्यंत दुर्देवी चित्र पाहायला मिळाले. राजपक्षे समर्थक आणि विरोधक खासदार आपसातच भिडले. दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. संसदेच्या अध्यक्षांना आवाजी मतदानाच्या बळावर आपल्याला पंतप्रधानपदावरुन हटवण्याचा अधिकार नाहीय असा महिंदा राजपक्षे यांचा दावा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजपक्षे सरकारविरोधात बुधवारी संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आज ही हाणामारी झाली. संसदेचे कामकाज सुरु होताच अध्यक्ष करु जयसूर्या यांनी देशामध्ये सरकार अस्तित्वात नाहीय. त्यामुळे कोणीही पंतप्रधान नाही असे जाहीर केले. त्यावरुन हा राडा सुरु झाला. महिंदा राजपक्षे यांनी संसद अध्यक्षांच्या या विधानावर आक्षेप घेतला. मतदान झाले पाहिजे पण इतका महत्वाचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करु नये. संसद अध्यक्ष जयसूर्या यांना पंतप्रधान नियुक्त करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार नाहीय असे राजपक्षे म्हणाले.

संसद अध्यक्ष पक्षपातीपणे वागून पक्षाची भूमिका मांडतायत असा आरोप राजपक्षे यांनी केला. कारु जयसूर्या युनायटेड नॅशनल पार्टीशी संबंधित आहेत. याच पक्षाचे प्रमुख रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरुन काढून टाकण्यात आले होते. पुन्हा नव्याने निवडणूका घेतल्या तर या संकटातून मार्ग निघू शकतो असे विक्रमसिंघे म्हणाले. राजपक्षे यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी मतदान घेण्याची मागणी केल्यानंतर संघर्षाला सुरुवात झाली.

राजपक्षे यांचे समर्थन करणारे खासदार सभागृहाच्या मध्यभागी जमले. काही जण घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनाच्या दिशेने धावले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये लाथा-बुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली. काही खासदारांनी पाण्याच्या बाटल्या, पुस्तके अध्यक्षांच्या दिशेने फेकून मारली. राजपक्षे यांना विरोध करणारे खासदार जयसूर्या यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्याभोवती जमले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसल्यानंतर जयसूर्या यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka lawmakers come to blows kicks
First published on: 15-11-2018 at 15:29 IST