सर्व दहशतवाद्यांचा खात्मा, अटक सुरक्षा अधिकाऱ्यांचा दावा

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असलेले सर्व इस्लामी दहशतवादी ठार झाले आहेत किंवा त्यांना अटक करण्यात आली असल्याने देश आता सुरक्षित असल्याचा दावा श्रीलंकेचे पोलीस आणि लष्करप्रमुखांनी दिला आहे.

श्रीलंकेच्या तीनही दलांचे कमांडर आणि पोलीस प्रमुखांनी सोमवारी रात्री एका पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात विशेष सुरक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा उपाययोजना आखण्यात आल्या असून योग्य पावलेही उचलण्यात आली आहेत.

श्रीलंकेतील तीन चर्च आणि तीन आलिशान हॉटेलांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याशी थेट संबंध असलेल्यांना ठार मारण्यात आले आहे किंवा अटक करण्यात आली आहे, असे प्रभारी पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.

स्थानिक इस्लामिक संघटना नॅशनल तौहीद जमातने हल्ल्यासाठी पुरविलेली सर्व स्फोटके ताब्यात घेण्यात आली आहेत. दहशतवादी गटांकडे असलेली स्र्व स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत, या गटाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला अटक करण्यात आली आहे, असे पोलीस महानिरीक्षक (प्रभारी) चंदन विक्रमरत्ने यांनी सांगितले.

या स्फोटांप्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली आहे ते विक्रमरत्ने यांनी सांगितले नाही, मात्र नऊ महिलांसह ७३ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुणशेखर यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांची सीआयडी आणि दहशतवाद तपास खात्यामार्फत चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले.

या हल्ल्यांनंतर देशामध्ये जारी करण्यात आलेली संचारबंदी उठविण्यात आल्याने आता देशातील जनजीवन पूर्वपदावर येईल, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही विक्रमरत्ने म्हणाले.