कोलंबो : श्रीलंकेत २०१९ मध्ये ईस्टरच्या दिवशी आत्मघाती स्फोट घडवून २७० जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी २५ आरोपींविरुद्धचा खटला मंगळवारी सुरू झाला. मोहम्मद नौफर हा या स्फोटांचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासयंत्रणांचे म्हणणे असून तो इस्लामिक स्टेटशी संबंधित आहे. या स्फोटाशी संबंधित तीन खटले चालविले जाणार आहेत. 

या प्रकरणातील दुसरा मुख्य संशयित वाय. एम. इब्राहिम हा आत्मघाती स्फोट घडविणारे इन्शाफ आणि इल्हम यांचा पिता असून त्याने कोलंबोतील दोन हॉटेलांनाही लक्ष्य केले होते. हा खटला गुंतागुंतीचा असून प्रदीर्घ काळ चालण्याची शक्यता येथील वकिलांनी व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या तुरुंगात ठेवलेल्या या आरोपींना वेगवेगळे गट करून कडेकोट बंदोबस्तात सकाळी कोलंबो उच्च न्यायालयात हजर करण्यात आले. स्फोटांबाबत पोलिसांनी आरोपींवर २३ हजारांहून अधिक आरोप ठेवले आहेत. यात कट, हत्या, हल्ल्यासाठी मदत, शस्त्रे-दारूगोळा जमा करणे आदींचा समावेश आहे. स्फोटातील आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, आरोपांची व्याप्ती लक्षात घेता हा खटला निकाली निघण्यास प्रदीर्घ म्हणजे काही दशकांचा काळ लागू शकतो.

वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठपका

सोमवारी पहिल्या खटल्यात देशाचे माजी पोलीस प्रमुख जयसुंद्रा यांच्यावरील आरोपांची सुनावणी सुरू झाली. या हल्ल्यांबाबत गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. जयसुंद्रा हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न याचे एकूण ८५५ दोषारोप वाचून दाखविण्यात आले. त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी एकूण १२१५ साक्षीदारांची नोंद करण्यात आली असली त्या सर्वानाच बोलावले जाईल असे नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. याच प्रकारचे आरोप संरक्षण खात्याचे  तत्कालीन उच्चाधिकारी रणजित देहिवाला आणि माजी संरक्षण सचिव हेमासिरी फर्नाडो यांच्यावरही ठेवण्यात आले आहेत. हे दोघेही सध्या जामिनावर आहेत.