आता जगातील पहिल्या ५० बँकांमध्ये समावेश
पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँक हे शनिवारी भारतीय स्टेट बँकेचे भाग बनले. यामुळे सध्या देशातील सगळ्यात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचा जगातील पहिल्या ५० बँकांमध्ये समावेश झाला आहे.
स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक या १ एप्रिलपासून प्रभावाने भारतीय स्टेट बँकेत विलीन झाल्याचे बँकेने एका निवेदनात सांगितले.
या सहापदरी विलीनीकरणामुळे मालमत्तेच्या दृष्टीने जगातील ५० आघाडीच्या बँकांमध्ये आपली बँक सामील झाल्याचेही स्टेट बँकेने म्हटले आहे.
या विलीनीकरणानंतर बँकेच्या ग्राहकांची संख्या ३७ कोटींवर पोहोचणार असून, देशभरात तिच्या २४ हजार शाखा आणि सुमारे ५९ हजार एटीएम राहणार आहेत. या विलीनीकृत बँकेकडे २६ लाख कोटी रुपयांहून अधिक ठेवी राहणार असून, कर्जाचा आकडा १८.५० लाख कोटी आहे.
बँकेच्या संक्रमणाची संपूर्ण प्रक्रिया तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे सांगून स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकेत विलीन झालेल्या सहयोगी बँकांचे स्वागत केले आहे. एकीकृत बँक उत्पादनक्षमता वाढवेल, भौगोलिक धोके कमी करेल, संचालनक्षमता वाढवेल आणि अधिक चांगली ग्राहकसेवा देईल, असे भट्टाचार्य म्हणाल्या.