Radhika Yadav Shot Dead: गुरूग्राम येथील राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राधिकाच्या वडिलांनीच हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, वडिलांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या राधिकाला लागल्या. या हत्येमागचा उद्देश अद्याप कळू शकलेला नाही, असेही पोलिसांनी सांगितले.
ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी घरात इतर सदस्य उपस्थित नव्हते, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली आहे. तसेच सेक्टर ५६ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, राधिका यादवने शूट केलेल्या एका रिलवरून कुटुंबात वाद झाला होता. या वादातून वडिलांनी राधिकाची हत्या केल्याचे सांगितले जाते. राधिकाच्या पोस्टमुळे वडील दीपक यादव यांना राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळ्या झाडल्याची माहिती मिळत आहे.
गुरुग्राम पोलीस ठाण्याचे जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार सोशल मीडिया पोस्टमुळे यादव कुटुंबात वाद झाला होता. या पोस्टमुळे संतापलेल्या वडिलांनी राधिकावर तीन गोळ्या झाडल्या. यानंतर कुटुंबियांनी राधिकाला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले.
कोण आहे राधिका यादव?
राधिका यादवचा जन्म २३ मार्च २००० साली झाला होता. हरियाणाची टेनिसपटू म्हणून ती चांगले नाव कमावत होती. तिने आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या नोंदीनुसार, १८ वर्षांखालील गटात तिने ७५, महिला दुहेरीत ५३ आणि महिला एकेरीत ३५ असे कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळवले होते.