ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथची प्रेक्षक हुर्यो उडवत असताना त्यांना शांत राहण्याबाबत भारतीय कर्णधार विराट कोहलीने केलेला इशारा ही एक श्रेष्ठ कृती असल्याचे ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याने म्हटले आहे.
वॉ हे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील महान आणि यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जातात. एक वर्षांच्या निलंबनानंतर परतूनदेखील स्मिथला अनेक प्रेक्षक डिवचत असल्याचे अनेक सामन्यांमधून बघायला मिळाले. ‘‘तुमचे नेतृत्व हे अनेक बाबींमधून दिसून येत असते. विराटने प्रेक्षकांना शांत राहण्याचा इशारा करताच सर्व प्रेक्षकांनीदेखील त्यानंतर घोषणाबाजी बंद केली. ही त्याची कृती खरोखरच वाखाणण्याजोगी होती,’’ असेही वॉने नमूद केले. वॉ यांनी १९९९ च्या विश्वचषकात संघाचे नेतृत्व करून ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले होते.