Stray Dogs In Lucknow Helped Police To Catch Bike Thieves: लखनऊमध्ये गेल्या एका वर्षापासून वाहन चोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. त्यांनी या कालावधीत ४० हून अधिक मोटारसायकली चोरल्या होत्या. पण आतापर्यंत ही टोळी पोलिसांच्या हाती लागली नव्हती. आता नुकतेच पोलिसांना या टोळीला गजाआड टाकण्यात यश आले असून, यासाठी पोलिसांना अप्रत्यक्षपणे भटक्या कुत्र्यांची मदत झाली.
रविवारी कुडिया घाटाजवळ या टोळीतील काही सदस्य दुचाकी चोरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते आणि पोलीस त्यांचा पाठलाग करत होते. पण अचानक समोरून काही भटके कुत्रे आले आणि त्यांच्यावर भुंकू लागले. कुत्रे हल्ला करतील, या भीतीने हे चोर दुसऱ्या एका बोळात शिरले. काही अंतराने रस्ता संपून एक घर लागल्याने चोरांना माघे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता, पण तिथे आधीच पोलीस दाखल झाल्याने वर्षभर वाहन चोरीचा धुमाकूळ घालणारे हे चोर अखेर पोलिसांच्या तावडीत सापडले.
लखनऊ पश्चिमचे पोलीस उपाधीक्षक विश्वजीत श्रीवास्तव म्हणाले की, “अटक केलेल्या आरोपींची नावे जुनैद (२४), अरस (२१), वंश गुप्ता (१९), राहुल गुप्ता (२७), सलमान (२८) आणि जावेद (२२) अशी आहेत. हे सर्व आरोपी सीतापूरचे रहिवासी आहेत. यावेळी एका १६ वर्षीय मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.”
दरम्यान, या अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी चोरीच्या ४० मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
श्रीवास्तव यांनी सांगितले की, एक व्यक्ती धावत पोलीस ठाण्यात आला आणि त्याची मोटारसायकल चोरी झाल्याचा दावा केला. यावेळी पळून जाणाऱ्या चोरांकडे बोट दाखवत तो पोलिसांना म्हणाला की, जर तुम्ही लवकर कारवाई केली, तर चोर सापडू शकतात.
त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वेळ वाया न घालवता चोरांचा पाठलाग केला. ४-५ किमी सतत पाठलाग केल्यानंतर चोर कुडिया घाटाजवळ चोरीची मोटारसायकल सोडून पळाले. पण पोलीस अधिकाऱ्याने तरीही चोरांचा पाठलाग सुरू ठेवला आणि भटक्या कुत्र्यांची अप्रत्यक्षपणे मदत झाल्याने चोर सापडले.
उपाधीक्षक विश्वजीत श्रीवास्तव म्हणाले, “जर कुत्रे तिथे नसते, तर हे चोर पुन्हा पळून गेले असते. यावेळी पीडिताचे मित्र असलेल्या कुत्र्यांनी पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली.”
नंतर, गुन्हेगारांनी किमान ४० वाहने चोरल्याची कबुली दिली, जी सोमवारी संध्याकाळी जप्त करण्यात आली. टोळीतील इतर दोन सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “ही टोळी नियमितपणे सीतापूर ते लखनऊ असा प्रवास करायची आणि या भागांतील मोटारसायकली चोरायची. मोटारसायकली चोरल्यानंतर त्या सीतापूरला परत नेत आणि नंतर त्या लखीमपूरमध्ये विकत.”