पीटीआय, नवी दिल्ली
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील फकीर मोहन (स्वायत्त) महाविद्यालयाच्या आत्मदहन केलेल्या विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान भुवनेश्वरच्या एम्स रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील जनतेमध्ये संताप उसळला आहे. या विद्यार्थिनीने लैंगिक छळाला कंटाळून शनिवारी स्वत:ला जाळून घेतले होते. त्यामध्ये ती ९५ टक्के भाजली होती.
विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे प्राध्यापकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग न झाल्याने तिने शनिवारी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती देण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला २० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. विद्यार्थिनीच्या पार्थिवावर मंगळवारी बालासोर जिल्ह्यातील तिच्या गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तिचे वडील आणि कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.
वेगवान तपासासाठी हालचाली
या प्रकरणाच्या वेगाने तपासासाठी ‘स्विफ्ट ट्रायल इनिशिएटिव्ह’ पथक स्थापन करण्यात आले आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. विद्यार्थिनीने १ जुलै रोजी अंतर्गत तक्रार समितीला लिहिलेल्या पत्राला एफआयआर मानले जात आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, विद्यापीठ निधी आयोगाने सत्य शोधक समिती स्थापन केली. ही समिती संस्थात्मक धोरणे, तक्रार निवारण यंत्रणा, छळविरोधी उपाययोजनांचा प्रभावीपणा तपासेल.