ड्रोन विमाने चालवणारे वैमानिक घडवण्याचा एक नवा उद्योग आता चीनमध्ये सुरू झाला असून त्यात अनेक विद्यार्थी सहभागी आहेत पण त्यात विद्यार्थिनींचे प्रमाण नगण्य आहेत.
वर्गात बसल्या बसल्या आभासी हेलिकॉप्टर्स उडवण्याचे प्रशिक्षण मुलांना दिले जाते, त्यात केवळ बोटांनी विशिष्ट कळा (बटणे) दाबून ही विमाने किंवा हेलिकॉप्टर्स नियंत्रित केली जातात, ते काम करणाऱ्यांना ड्रोन वैमानिक असे म्हटले जाते.
त्रिमिती शहर आरेखक ते अश्रुधूर सोडणे अशी वेगवेगळी कामे करणारे ड्रोन तयार करण्याचे काम चीनने सुरू केले आहे.
ड्रोन विमानांचा चीन हा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ड्रोन नियंत्रण कौशल्ये शिकवणाऱ्या शाळांमध्ये सध्या तरुणांची रीघ लागली आहे. टीटी अॅव्हिएशन टेक्नॉलॉजी कंपनी ही चीनमधील ४० ड्रोन कंपन्यांपैकी एक असून त्यांनी तरुणांना ड्रोन क्षेत्रात आकर्षक नोक ऱ्या देऊ केल्या आहेत. दोन आठवडय़ाच्या अभ्यासक्रमाचे शुल्क ८ हजार युआन म्हणजे १२०० डॉलर्स आहे तेथे मुले ड्रोनचे नियंत्रण शिकतात व सादृश्यीकरण तंत्राने शिकल्यानंतर त्यांना चीनच्या हवाई वाहतूक प्रशासनाचा परवाना मिळतो. सात किलोपेक्षा जास्त वजनाची व १२० मीटर म्हणजे ४०० फुटांपेक्षा जास्त उंचीवरून उडणारी विमाने नियंत्रित करण्याची यात परवानगी दिली जाते.
ड्रोन विमान चालवण्याच्या नोकरीत महिन्याला सरासरी ५ हजार युआन म्हणजे ७८० डॉलर्स मिळतात. काहींना दुप्पट वेतनही मिळते. मी माझी स्वत:ची कंपनी काढणार आहे. तेथे रेडिओ लहरींवर हेलिकॉप्टर्स नियंत्रित केली जातील, मी माझ्यासाठी काम करायचे ही नवी कल्पना आहे, असे एका तरुणाने सांगितले.
ड्रोन नियंत्रण क्षेत्रात भरपूर संधी आहेत, चीनमध्ये किमान १० हजार वैमानिक किंवा संचालक देशातील ड्रोन उद्योगात हवे आहेत व सध्या १ हजार परवानाधारक ड्रोन संचालक वैमानिक आहेत, असे टीटी अॅव्हिएशनचे महाव्यवस्थापक यांग यी यांनी सांगितले. ड्रोन चालक व मोटार चालक सारखेच आहेत, त्यांना सारखेच प्रशिक्षण लागते, नियम माहिती असावे लागतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी, रसद पुरवठा, चित्रपट निर्मिती व कायदा-सुव्यवस्था या क्षेत्रात ड्रोन विमाने व हेलिकॉप्टर्स आमूलाग्र बदल घडवणार आहेत. चीन सरकारचा त्याला पाठिंबा आहे, रोबोटिक्स व स्वयंचलित यंत्रांच्या मदतीने कामगारांवरचा खर्च कमी केला जाईल, सध्या तो वाढत आहे. औद्योगिक वापराशिवाय इतर कारणांसाठीही ड्रोनची निर्मिती केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2016 रोजी प्रकाशित
चीनमध्ये ड्रोन संचालनात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
ड्रोन विमाने चालवणारे वैमानिक घडवण्याचा एक नवा उद्योग आता चीनमध्ये सुरू झाला
First published on: 01-02-2016 at 00:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students participation in china drone operation