भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सराकार – २.०’ च्या ५० दिवसांच्या कामकाजाचा लेखाजोखा सादर केला. यावेळी त्यांनी म्हटले की, मोदी सरकारने ५० दिवसांत घेतलेले निर्णय हे ५० वर्षांमध्ये घेतलेल्या निर्णयांपेक्षा अधिक चांगले आहेत.

यावेळी नड्डा यांनी सांगितले की, आतापर्यंत सरकारचा १०० दिवसांचा कार्य अहवाल सादर केला जात होता. मात्र पंतप्रधान मोदींनी यापुढे ५० दिवसांचा अहवाल देण्याचा निर्णय घेतला असल्याने हा अहवाल मी सादर करत आहे.

२०२४ पर्यंत सर्व घरांना पिण्याचे पाणी पुरवले जाईल, ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’च्या माध्यमातून ८० हजार कोटींचा खर्च करून १.२५ लाख किलोमीटर लांबीच्या रस्ते तयार केले जाणार आहे. २०२२ पर्यंत १ कोटी ९२ लाख घरे देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच वर्षात ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचवण्याचे जे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, त्यासाठी एक लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली असल्याचेही  नड्डा म्हणाले.