तिहार कारागृहात रॉय यांना सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच वागणूक

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा कारागृहातील पहिला दिवस सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच गेला. रॉय यांचे पुत्र, बंधू आणि समूहातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली तर उरलेला वेळ रॉय यांनी वृत्तपत्रांचे वाचन करण्यात घालविला.

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा कारागृहातील पहिला दिवस सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच गेला. रॉय यांचे पुत्र, बंधू आणि समूहातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली तर उरलेला वेळ रॉय यांनी वृत्तपत्रांचे वाचन करण्यात घालविला.
रॉय यांना बुधवारी सायंकाळी तिहार कारागृहात आणण्यात आले. त्यांची रवानगी तुरुंग क्रमांक तीनमधील चार क्रमांकाच्या कक्षात करण्यात आली असून तेथेच टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना ठेवण्यात आले आहे. रॉय यांचे वय ६५ वर्षे असल्याने त्यांना झोपण्यासाठी बिछाना उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले. रॉय यांना जमिनीवरच झोपावे लागेल, असे प्रथम कारागृहातील अधिकाऱ्यांनी म्हटले होते. मात्र त्यांचे वय ६५ असल्याने त्यांना कारागृहाच्या नियमानुसार बिछाना उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रात्रभर रॉय यांनी चांगली झोप घेतली, सकाळी वृत्तपत्रांचे वाचन केले आणि चहा व पाव अशी न्याहारीही घेतली. कारागृहातील जेवणही घेतले आणि त्यानंतर त्यांनी कारागृहाच्या उपाहारगृहातून खाद्यपदार्थ मागविले. रॉय यांचा मुलगा, बंधू आणि समूहाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर समूहातील एका महिला अधिकाऱ्यानेही त्यांची भेट घेतली. कारागृहाच्या नियमानुसार एका कैद्याला दररोज ४०० ग्रॅम धान्याची चपाती, २५० ग्रॅम भाजी आणि ९० ग्रॅम डाळ दिली जाते. त्या नियमानुसार रॉय यांना जेवण देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.रॉय यांना सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात आली, त्यांच्यावर मेहेरनजर करण्यात आली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रॉय यांनीही कोणतीही विशेष मागणी केली नाही.
रॉय यांच्यासह समूहाचे अन्य दोन संचालक रविशंकर दुबे आणि अशोक रॉय यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून महिला संचालक वंदना भार्गव यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Subrata roy get common jail prisoner treatment in tihar