हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगली कामं करण्यासाठी सक्षम व्हायला हवं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. नोएडा इथं झालेल्या ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. फाळणीच्या वेळी भारताला जे भोगावं लागलं ते विसरता येणार नाही, असंही भागवत यावेळी म्हणाले.

नोएडामध्ये कृष्णानंद सागर लिखित ‘विभाजनकालीन भारत के साक्षी’ या पुस्तकाचं काल प्रकाशन करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना मोहन भागवत म्हणाले, आपण आपला इतिहास वाचायला हवा आणि सत्य स्वीकारायला हवं. हिंदू समाजाने जगासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी सक्षम व्हायला हवं.

भारताच्या फाळणीसंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, भारताने फाळणीच्या काळात जे सोसलं आहे, ते विसरता येणार नाही. ते केवळ तेव्हाच विसरता येईल जेव्हा पुन्हा सगळं पूर्वीसारखं होऊन फाळणी रद्द होईल. सर्वांना सोबत घेऊन चालणारी भारताची विचारधारा आहे. स्वतः बरोबर आणि बाकीचे सगळे चूक असं मानणारी ही विचारधारा नाही. मात्र इस्लामिक आक्रमकांची मात्र विचारसरणी अशीच होती की फक्त आपणच बरोबर बाकी सगळे चूक. ब्रिटीशांची विचारसरणीही तशीच होती. इतिहासात घडलेल्या वादाचं, लढाईचं मूळ हेच होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भागवत पुढे म्हणाले, या आक्रमकांनीच १८५७ च्या उठावानंतर हिंदू-मुस्लिमांच्यात फूट पाडली. हा २०२१ मधला भारत आहे, १९४७ मधला नाही. एकदा फाळणी झाली, पण आता ती पुन्हा होणार नाही.