इराकमध्ये मंगळवारी आत्मघातकी बॉम्बहल्ला तसेच वेगवेगळ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुमारे ३३ जणांचा मृत्यू झाला असून, ८० हून अधिक जखमी झाले. २०११ मध्ये इराकमधून अमेरिकी फौजा परतल्यानंतर ३० एप्रिल रोजी देशात प्रथमच निवडणूक होणार आहे. या पाश्र्वभूमीवर देशात हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
२००८ पासून इराकमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आता लोकशाही मार्गाने निवडणुका होऊ घातल्या असतानाच हिंसाचारात वाढ झाल्यामुळे शियापंथीयांचा प्रभाव असलेल्या सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दक्षिण बगदादमधील सवेराह शहरात हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी एका कारमध्ये मोठय़ा प्रमाणात स्फोटके भरून ती पोलीस चौकीवर आदळली. यावेळी झालेल्या स्फोटात पाच पोलीस आणि सात नागरिक असे १२ जण ठार झाले, तर १९ जण जखमी झाले.
दुसऱ्या एका घटनेत आग्नेय बगदादपासून २० किमी अंतरावरील मदाइन शहरात दहशतवाद्यांनी कारबॉम्बच्या सहाय्याने लष्करी चौकीवर हल्ला केला. यामध्ये तीन सैनिक आणि दोन नागरिक ठार झाले, तर १२ जण गंभीर जखमी झाले.