माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला असल्याचे मत येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एआयआयएमएस) तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने नोंदवले आहे. मृत्यूसमयी सुनंदा यांच्या पोटात अ‍ॅलप्रॅक्स हे द्रव्य सापडल्याचे वैद्यकीय पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे.
दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळला होता. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट होत होते. त्यावरूनच सुनंदा यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एम्सच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालात सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट केले होते.
सुनंदा यांच्यावर विषप्रयोग झाला असावा असे या अहवालात म्हटले आहे. मात्र, त्यांना विषाचे इंजेक्शन टोचण्यात आले किंवा कसे याबाबत संदिग्धता आहे.