संपूर्ण जगभर दिवाळी धूमधडाक्यात साजऱ्या करणाऱ्या भारतीयांना यंदा अंतराळातूनही दिवाळीच्या शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत. नासाच्या विशेष अवकाश मोहिमेसाठी सध्या अवकाशात असलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सने मंगळवारी जगभरातील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळीनिमित्त एका स्थानिक दूरचित्रवाणी कार्यक्रमात सुनीता विल्यम्सची मुलाखत घेण्यात आली. न्यूयॉर्क विद्यापीठातील भारतीय वंशाची विद्यार्थिनी रिता भल्ला हिने सुनीताची मुलाखत घेतली. या वेळी सुनीताने दिवाळीनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवाळी हा एक अनोखा सण असून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात तो साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे, असे सुनीताने या वेळी सांगितले. आपल्या आजवरच्या प्रवासात नेहमीच पाठीशी असलेल्या भारतीयांचेही तिने या वेळी आभार मानले. आपला अंतराळ प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी अनेक भारतीयांनी आजवर प्रार्थना केली आहे. त्या सर्वाचे आभार मानण्यासाठी मी कदाचित पुढील दिवाळी भारतामध्ये साजरी करेन, असा मनोदयही सुनीताने या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. सुमारे ७५ देशांमध्ये सुनीताच्या या मुलाखतीचे प्रक्षेपण करण्यात आले.