द्रमुकचे सर्वेसर्वा म्हणून नावलौकिक असणाऱ्या एम.करुणानिधी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ९४व्या वर्षी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासूनच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, राजकीय पटलावरील दिग्गजांची ही एक्झिट सध्या अनेकांनाच चटका लावून गेली आहे. करुणानिधी यांच्यानिधनानंतर सर्वच स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, कलाकार मंडळीही यात मागे नाहीत.

काही महिन्यांपूर्वी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनीही करुणानिधी यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ‘एक कलाकार म्हणून हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस आहे. मी हा दिवस कधीही विसरु शकत नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’, असं ट्विट करत रजनीकांत यांनी दु:ख व्यक्त केलं.

वाचा : लेखणीतून समाजहितासाठी झटणारे सच्चे पटकथाकार, एम.करुणानिधी

ते माझ्या गुरुस्थानी होते- कमल हसन
अभिनेते कमल हसन यांनीही न्यूज १८शी संवाद साधताना करुणानिधींच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. करुणानिधी आपल्या गुरुस्थानी असल्याचं ते न विसरता म्हणाले. ‘त्यांच्यामुळे मी खऱ्या अर्थाने तामिळ भाषा शिकलो. मी ज्या तीन व्यक्तींना गुरुस्थानी मानत होतो, त्यांच्यापैकी ते एक होते. आज ते आपल्यात नसल्यामुळे मला फारच दु:ख होत आहे. सात दशकांहून अधिक काळ ते तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होते. बऱ्याच कारणांसाठी पिढ्यानपिढ्या ते प्रकाशझोतात राहिले. जनसामान्यांचा नेते होते. त्यांना माझा सलाम आहे. राजकारणाविषयी सांगाव तर मी त्यांच्या प्रत्येक कृतीतून बरंच काही शिकलो.’