पीटीआय, अमरावती

आंध्र प्रदेशातील कथित मद्य घोटाळा प्रकरणी राज्य पोलिसांनी मंगळवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. हा कथित मद्यघोटाळा ३,५०० कोटी रुपयांचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जगनमोहन रेड्डी यांनी जुलै २०१९मध्ये एका नवीन मद्य धोरणाशी संबंधित बैठकीचे अध्यक्षपद भूषवले होते. या धोरणांतर्गत मद्याची दुकाने ‘एपीएसबीसीएल’ या सरकारी संस्थेद्वारे चालवली जाणार होती, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी १२४ पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.

गेल्या महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी हे दरमहा सरासरी ५०-६० कोटी रुपयांची लाच स्वीकारणाऱ्यांपैकी एक असल्याचा उल्लेख होता. तथापि, ३०५ पानांच्या आरोपपत्रात जगन यांचा आरोपी म्हणून थेट उल्लेख केला नव्हता. मात्र पुरवणी आरोपपत्रामध्ये लाचखोरीची रक्कम पद्धतशीरपणे कमी-महत्त्वाच्या व्यक्ती, जसे की कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फत वळवली गेली, असा असा आरोप करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत, दुकानांची संख्या, जागा भाड्याने घेणे, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि वाहतूक खर्च यासंबंधीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या होत्या, असे पोलिसांनी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, एपीएसबीसीएल यांच्या पत्राचा हवाला देत म्हटले आहे.

नियम डावलून नियुक्ती

तत्कालीन मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी डी. वासुदेव रेड्डी (आरोपी क्र. २) यांची इतर पदांसाठी शिफारस करूनही, जगन यांनी त्यांची एपीएसबीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असाही आरोपही पोलिसांनी केला आहे. वासुदेव रेड्डी हे आयआरटीएस अधिकारी आहेत. मात्र आरोपपत्रातील सर्व आरोप निराधार असल्याचे माजी मंत्री आणि वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते अंबाती रामबाबू यांनी पीटीआयला सांगितले.