नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बनावट चित्रफीत तयार केल्याप्रकरणी वेगवेगळय़ा ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले झी न्यूजचे वृत्तनिवेदक रोहित रंजन यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. रंजन यांच्याविरोधात कोणतीही बळाची कारवाई करू नये, किंवा त्यांना ताब्यातही घेऊ नये, असे निर्देश न्यायालयाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.  

 छत्तीसगड पोलिसांचे पथक मंगळवारी रंजन यांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद शहरात त्यांच्या घरी गेले होते. पण त्या वेळी त्यांना नोइडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यांची त्याच दिवशी रात्री जामिनावर सुटका झाली होती.   राहुल यांच्याबाबतची ही वादग्रस्त ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंजन यांनी हे चुकीने घडल्याचे सांगून क्षमा मागितली होती. राहुल यांची विधाने संदर्भ सोडून उदयपूर हत्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे भासविण्यात आले होते. वास्तविक ही विधाने राहुल यांच्या वायनाड कार्यालयावर हल्ला करणाऱ्या एफएसआयच्या कार्यकर्त्यांना उद्देशून होती.