नवी दिल्ली : ‘सीएए’विरोधात आवाज उठवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणे ‘अत्यंत विचित्र’ आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने हिंदू धर्म परिषदेची कानउघाडणी केली. न्यायालयाने फटकारल्यानंतर वकिलांनी आपण ही याचिका मागे घेत असल्याचे सांगितले.
‘नागरिकत्व कायदा (सुधारणा) २०१९’मधील (सीएए) तरतुदींना आक्षेप घेणाऱ्या अनेक याचिकांवर न्या. संजय किशन कौल आणि न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. यात हिंदू धर्म परिषदेच्या वकिलांनी ‘सीएएविरोधात आवाज उठवण्यावर प्रतिबंध करावा’, अशी मागणी करणारी याचिका अन्य याचिकांसोबत जोडण्याची विनंती न्यायालयाला केली. यावर ‘एक दिवस तुम्ही उठाल आणि अशा प्रकारची विनंती करणारी याचिका दाखल कराल? तुमच्या विनंतीकडे बघा. ती अत्यंत विचित्र आहे,’ अशा शब्दांत न्यायालयाने वकिलांना खडसावले. त्यावर ही याचिका २०२० साली दाखल करण्यात आल्याचे वकिलांनी म्हटले. त्यानंतर ‘तुम्ही ही याचिका मागे घेता की आम्ही आदेश काढू?’ असा प्रश्नही न्या. कौल यांनी विचारला. त्यावर वकिलांनी याचिका मागे घेत असल्याचे सांगितले.