पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या अचानक राजीनाम्यानंतर निर्माण झालेला घटनात्मक पेच तूर्तास टळला असून नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की हंगामी सरकारचे नेतृत्व करतील असे राष्ट्रपती कार्यालयाने जाहीर केले आहे. नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांच्या कारकिर्दीसाठी व्यापक आदर असलेल्या ७३ वर्षीय कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनून इतिहास घडवणार आहेत.

राष्ट्रपती रण चंद्र पौडेल, नेपाळचे उच्च लष्करी अधिकारी आणि ‘जेन झेड’चे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीनंतर कार्की यांची अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली. दरम्यान, रविवारपासून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात निदर्शनांनंतर नेपाळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची पुनर्स्थापना करण्याचे आव्हान कार्की यांच्यासमोर आहे.

तत्पूर्वी सरकारविरोधी निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या युवा नेतृत्वाखालील ‘जेन झी’ च्या प्रतिनिधींसह विविध संघटनांची एक बैठक शीतल निवास येथील राष्ट्रपती कार्यालयात झाली. या बैठकीत कार्की, काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह, नेपाळ वीज प्राधिकरणाचे माजी सीईओ कुलमन घिसिंग आणि धरानचे महापौर हरका संपांग उपस्थित होते. हंगामी पंतप्रधानपदासाठी कार्की यांच्या नावावर सर्व पक्षांचे एकमत झाले, असे सूत्रांनी सांगितले.

भारतीय पर्यटक बसवर हल्ला

● नेपाळमध्ये सुरू असलेल्या अशांततेदरम्यान, काठमांडूमधील पशुपतिनाथ मंदिरातून परतणाऱ्या भारतीय पर्यटक बसवर निदर्शकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमी झाले असल्याचा बसचालकाने दावा केला. ही कथित घटना ९ सप्टेंबर रोजी भारत-नेपाळ सीमेवरील सोनौलीजवळ घडली. निदर्शकांनी ४९ भारतीय नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य करीत दगडफेक केली. या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या आणि महिला व वृद्धांसह अनेक प्रवासी जखमी झाल्याचा दावा चालकाने केला आहे.

● स्थानिक वृत्तानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांनी जखमींना काठमांडूमधील रुग्णालयात दाखल केले, तर उर्वरित प्रवाशांना नेपाळ सरकारच्या मदतीने भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या विशेष विमानाने भारतात परत पाठवण्यात आले.

● आम्ही पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतत होतो तेव्हा अचानक एका जमावाने आमच्या बसला घेरले आणि कोणतेही कारण नसताना हल्ला केला. प्रवाशांमध्ये महिला आणि वृद्ध लोक होते पण निदर्शकांना त्याची पर्वा नव्हती, असे सोनौली येथे पत्रकारांशी बोलताना बसचालक रामू निषाद यांनी सांगितले.

हॉटेल उद्याोगाचे २५ अब्ज रुपयांचे नुकसान

नेपाळमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये देशभरातील सुमारे दोन डझन हॉटेल्सची मोडतोड, लूटमार किंवा जाळपोळ करण्यात आली. यामुळे, पर्यटनावर आधारित नेपाळी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा महसूल मिळवून देणाऱ्या हॉटेल उद्याोगाचे २५ अब्ज रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेल असोसिएशन नेपाळच्या दाखल्यानुसार, हिंसाचारामुळे काठमांडूचे हिल्टन हॉटेल सर्वात जास्त प्रभावित झाले आहे. काठमांडू खोरे, पोखरा, बुटवल, भैरहवा, झापा, विराटनगर, धनगढी, महोत्तरी आणि डांग-तुलसीपूरमधील इतर प्रमुख देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या हॉटेल्सनाही हिंसाचाराचा फटका बसला आहे. दरम्यान, अनेक हॉटेल्स दुरुस्ती आणि पुनर्बांधणीशिवाय पुन्हा काम सुरू करू शकणार नसल्यामुळे २००० हून अधिक कामगारांच्या नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.