वृत्तसंस्था, काठमांडू

हिंसात्मक जनआंदोलन करून पंतप्रधानांना पदच्युत केल्यानंतर नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अंतरिम सरकारचे नेतृत्व कोणी करायचे याबाबत अनिश्चितता आहे. जनआंदोलन करणाऱ्या ‘जेन झी’च्या बहुतेक सदस्यांनी माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांना पाठिंबा दिला असला तरी एका गटाचा मात्र त्यांना विरोध आहे.

के. पी. शर्मा ओली सरकारच्या धोरणांना विरोध करत मंगळवारी नेपाळमध्ये मोठे जनआंदोलन झाले. पार्लमेंटसह सरकारी इमारतींना आगी लावत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. लष्कराने सत्ता हाती घेतली असून कायदा- सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या हालचालींनी जोर धरला आहे. मात्र या सरकारचे नेतृत्व कोणी करावे याबाबत मात्र एकमत नाही.

वीज मंडळाच्या माजी प्रमुखाच्या नावाचा प्रस्ताव

‘जेन झी’च्या प्रतिनिधींनी गुरुवारी नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल आणि लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांच्याशी भद्रकाली येथील लष्कराच्या मुख्यालयात अंतरिम सरकारचे नेतृत्व कोणी करावे याबाबत चर्चा केली. मात्र या दीर्घ चर्चेनंतरही अद्याप निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

माजी सरन्यायाधीय सुशीला कार्की, काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा, नेपाळ वीज प्राधिकरणाचे माजी अधिकारी कुलमन घिसिंग आणि धरण शहराचे महापौर हर्का संपांग या नावांबाबत चर्चा सुरू आहे. ऑनलाइन मतदानात बहुमतानो कार्की यांना पाठिंबा देण्यात आला आहे, मात्र दुसऱ्या गटाने त्यांना विरोध करून घिसिंग यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

बालेंद्र शहा यांचे नाव मागे

अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा यांचे नाव सुरुवातील आघाडीवर होते. मात्र आपण या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्की यांच्या नावाच्या प्रस्तवाला पाठिंबा दिला.

विविध तुरुंगातून हजारो कैद्यांचे पलायन

● नेपाळमधील तुरुंगात कैदी आणि सुरक्षा दलांमध्ये उडालेल्या संघर्षात किमान तीन कैद्यांचा मृत्यू झाला असून, १५ हजारांहून अधिक कैदी विविध तुरुंगांतून पळून गेले आहेत.

● गुरुवारी झालेल्या तीन कैद्यांच्या मृत्यूमुळे मंगळवारपासून सुरू असलेल्या संघर्षातील एकूण मृत कैद्यांची संख्या आठ झाली आहे. गुरुवारी झालेल्या घटनेत तीन कैद्यांच्या मृत्यूसह १३ कैदी जखमी झाले.

● मधेश प्रांतातील तुरुंगात सुरक्षा दलांबरोबर कैद्यांचा संघर्ष उडाल्याचे पोलिसांनी सांगितले. कैद्यांनी गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी या वेळी गोळीबार केला. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

● नेपाळमध्ये विविध २५ तुरुंगातून १५ हजारांहून कैदी पळून गेल्याचे वृत्त आहे. जे स्वत:हून परत येत आहेत, तेच केवळ तुरुंगात असल्याचे चित्र आहे.

● नेमके किती कैदी पळून गेले, याचा आकडा अंतिम करण्यात येत असल्याचे तुरुंग व्यवस्थापन विभागाने सांगितले.

● कैद्यांना पुन्हा पकडण्यासाठी लष्कर, सुरक्षा दलांसह पोलीस देशभरात तैनात करण्यात आले असल्याची माहिती महासंचालक लीला प्रसाद शर्मा यांनी दिली.

शांततेचे आवाहन

नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी गुरुवारी देशात शांतता आणि सहकार्य प्रस्थापित करण्याचे आवाहन सर्व पक्षकारांना केले. सध्याच्या राजकीय स्थितीवर घटनात्मक चौकटीत मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नेपाळमधील अराजकावर अध्यक्षांनी प्रथमच भाष्य केले आहे. ‘जेन झी’ या आंदोलक गटाने अध्यक्षांचे कार्यालय आणि त्यांचे खासगी निवासस्थान मंगळवारी जाळले. त्यानंतर अध्यक्ष जाहीररीत्या कुठेही दिसले नाहीत. पौडेल सध्या लष्कराच्या सुरक्षिततेखाली आहेत. त्यांनी सर्व जनतेला आणि आंदोलकांना संयम बाळगण्याचे, कायदा-सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी अध्यक्ष पौडेल आणि लष्करप्रमुख अशोक राज सिद्गेल यांनी ‘जेन झी’ गटातील प्रतिनिधींशी लष्कराच्या मुख्यालयात हंगामी नेतृत्वाबाबत चर्चा केली.