लोकसभेच्या विरोधी पक्ष आणि भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी मध्यप्रदेशातील आपल्या विदिशा लोकसभा मतदार संघात प्रचाराचे रणशिंग फुंकले खरे परंतु, त्यांच्या संपूर्ण प्रचारात नरेंद्र मोदींचा साधा उल्लेखही झालेला दिसला नाही किंवा मोदींचे ‘मिशन २७२+’ हा संकल्पही गायब होता.
त्यामुळे स्वराज आणि मोदींमध्ये अंतर्गत छुपा संघर्ष असल्याची चर्चा प्रकर्षाने अधोरेखित होत आहे.
सुषमा स्वराज यांच्या मतदार संघातील प्रचारसभा असो वा, रॅली असो कोणत्याही माध्यमातून मोदींचा उल्लेखही केला गेला नाही किंवा मोदींचे ‘मिशन २७२+’ संकल्पही कुठे पहावयास मिळत नाही. सुषमा स्वराज मध्यप्रदेशातील सर्व लोकसभेच्या जागा जिंकण्याचे ‘मिशन २९’ या संकल्पाचा प्रचार करत आहेत.
स्वराज आपल्या प्रचारसभेत म्हणतात की, “मी केवळ राजकीय भाषणे देण्यासाठी आलेली नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज असते. पहिली म्हणजे पक्षासाठी चांगले वातावरण तयार करणे आणि दुसरी म्हणजे स्थानिक स्तरातील संघटना पातळीवर काम करणे. या दोन्ही गोष्टी पाळता आल्या, तर आपला विजय कोणही रोखू शकणार नाही. तसेच २००९ सालच्या निवडणूकीत ३.८९ लाख मतांनी माझा विजय झाला होता यावेळी हा आकडा ४ लाखांच्या वर गेला पाहिजे”, असे आवाहनही स्वराज पक्ष कार्यकर्त्यांना करतात.
एकंदर विदिशा मतदार संघात स्वराज यांच्या प्रचारात कुठेच मोदी किंवा त्यांचे ‘मिशन २७२’ ही दिसले नाही. तसेच या मतदार संघातील पोस्टर्सवर लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांना समान जागा देण्यात आली आहे मात्र, स्वत: स्वराज आणि शिवराजसिंह चौहान यांची आकाराने मोठी छायाचित्रे यावर आहेत. ‘सांसद में सशक्त आवाज, सुषमा स्वराज’ अशी घोषणा छापण्यात आली आहे. यात नरेंद्र मोदींचा कोठेही उल्लेख नाही.
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2014 रोजी प्रकाशित
सुषमा स्वराज यांच्या प्रचारातून नरेंद्र मोदी गायब!
त्यांच्या संपूर्ण प्रचारात नरेंद्र मोदींचा साधा उल्लेखही झालेला दिसला नाही किंवा मोदींचे मिशन २७२+ हा संकल्पही गायब होता.

First published on: 26-03-2014 at 12:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma hits campaign road without a mention of modi