Subbanna Ayyappan : पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह कर्नाटकमधील श्रीरंगपट्टण येथील कावेरी नदीवर आढळून आल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कर्नाटक पोलिसांनी सुब्बन्ना अय्यपन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सुरु केला आहे.

डॉ.सुब्बन्ना अय्यपन हे कृषी आणि मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ञ होते. तसेच ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICMR) अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. दरम्यान, ते म्हैसूरमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी डॉ.सुब्बन्ना अय्यपन हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेतला जात होता. पण ते कोठेही आढळून आले नव्हते. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, श्रीरंगपट्टणा जवळील कावेरी नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता अशी माहिती शनिवारी समोर आली होती. तसेच त्यांची दुचाकीही नदीकाठी आढळून आल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच त्याच्या मृत्यूचं कारण नेमकं काय? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

डॉ.सुब्बन्ना अय्यप्पन हे मूळ कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील येलंदूर येथील आहेत. त्यांनी मंगळुरू येथून मत्स्य विज्ञानात पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये बेंगळुरू येथील कृषी विज्ञान विद्यापीठातून पीएचडी मिळवली होती. तसेच ते हैदराबादमधील राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळाचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी देखील होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचबरोबर त्यांनी भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभागात सचिवपद देखील भूषवलं होतं. दरम्यान, भारताच्या ‘ब्लू रेव्होल्यूशन’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याच्या पार्श्वभूमीवर २०२२ मध्ये डॉ.सुब्बन्ना अय्यपन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.