पीटीआय, न्यू यॉर्क
अमेरिकेच्या मेरिलँड राज्यात एक भारतीय जोडपे व त्यांचा सहा वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या मते हे दुहेरी आत्महत्या व खुनाचे प्रकरण आहे.
पोलिसांचे पथक शुक्रवारी दुपारी या ठिकाणी पोहोचले, तेव्हा मूळचे कर्नाटकातील असलेले हे तिघे बाल्टिमोर परगण्यातील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरांवर बंदुकीच्या गोळय़ांच्या खुणा होत्या, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले. योगेश नागराजप्पा (३७), प्रतिभा अमरनाथ (३७) व यश होन्नाळ (६) अशी या मृतांची नावे आहेत. पती-पत्नी व मुलगा असे त्यांचे नाते असल्याचे मानले जाते, असे पोलीस म्हणाले.
नागराजप्पा याने आधी पत्नी व मुलाचा खून केला व नंतर आत्महत्या केली, असे प्राथमिक तपासावरून दिसते, असे बाल्टिमोर परगणा पोलिसांचे प्रवक्ते अँथनी शेल्टन यांनी सांगितल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्राने दिले.