स्वामी अग्निवेश हे भगवे कपडे परिधान करून सर्वसामान्य जनतेला फसवतात. ते स्वामी नसून लबाड व्यक्ती असल्याची टीका झारखंडचे मंत्री सी पी सिंग यांनी केली आहे. प्रसिद्धीसाठी अग्निवेश यांनी स्वत:वर हल्ला करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी हल्ला केला होता. झारखंडमधील पाकूर भागात दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यावर सिंग यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री रघुवरदास यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सी पी सिंग म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे स्वामी अग्निवेश हे परदेशी निधीवर जगणारे व्यक्ती आहेत. भगवे कपडे घालून ते सर्वसामान्य व्यक्तीला फसवत आहेत. ते स्वामी नाहीत ते लबाड आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांनी प्रसिद्धीसाठी स्वत:वर हल्ला करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अग्निवेश झारखंडमधील पाकूर येथे आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते हॉटेलमधून बाहेर पडतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. बीफ खाण्याच्या समर्थनार्थ स्वामी अग्निवेश यांनी नुकतेच एक विधान केले होते. त्यावरुन चिडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. हल्लेखोरांनी अग्निवेश यांना बेदम मारहाण केली, तसेच त्यांचे कपडेही फाडले होते. त्याचबरोबर त्यांनी यावेळी काळे झेंडेही दाखवले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swami agnivesh is a person who wears saffron dress that and deceive the simple indians says c p singh
First published on: 18-07-2018 at 13:57 IST