स्वात खोरे हा परिसर अतिशय निसर्गरम्य..सदाबहार हरित पर्वतीय परिसराने नटलेला, ‘पाकिस्तानचे स्वित्झर्लण्ड’ अशीही त्याची ओळख. सर्वत्र धबधबे आणि झऱ्यांचेच साम्राज्य. याच परिसरात रेशमी कपडय़ांचा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने फोफावला, विस्तारला. परंतु पाकिस्तानी तालिबान्यांच्या अतिरेकी दहशतवादी कारवायांमुळे आज हा व्यवसाय पूर्णपणे मृतप्राय झाला आहे,
तालिबान्यांनी या व्यवसायाचीच हत्या केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या व्यवसायाची वाताहात झाल्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेले, त्यावर आपली रोजीरोटी कमावणारे हजारो कारागीर, व्यावसायिक आज बेरोजगार झाले असून काम नसल्यामुळे त्यांना स्वातचा त्याग करावा लागत आहे.
साधारण १९६०च्या दशकात लाहोर येथून आलेल्या शौकत अली यांची कथा काहीशी अशीच आहे. त्या काळात रेशमी कपडय़ांचा उद्योग भरभराटीस येत होता. त्यामुळे शौकत अली यांनी आपले भांडवल या व्यवसायात गुंतविले. रेशमी कापडासाठी आवश्यक असलेला ताग आणि इतर कच्च्या मालाची अफगाणिस्तानातून तस्करीच होत असे. त्याच्या जोडीला स्वस्तातील मजूरवर्गाचीही कमतरता नव्हती.
स्वातमध्ये हा व्यवसाय भर तेजीत आला, त्यावेळी त्यामध्ये २५ हजार लोक गुंतले होते. कच्च्या स्वरूपातील कापड बनवून ते वस्त्रोद्योगात गुंतलेल्या केंद्रांना विकण्याचा धंदा प्रामुख्याने या ठिकाणी होता.
व्यावसायिकांवर कर्जाचा बोजा
शौकत अली यांच्याकडे या भागातील कारखान्यांमधील यंत्रांची दुरुस्ती करण्याचा मक्ता होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. दरमहा ८० हजार रुपयांची त्यांची प्राप्ती होती. मात्र, २००७ मध्ये तालिबान्यांनी या परिसराचा कब्जा घेतल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. आज हे सर्व थांबले आहे. आता हा व्यवसाय उद्ध्वस्त झाला असून आपल्यावर शेकडो, हजारो रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याचे शौकत अली विषण्णपणे सांगतात.
अतिरेक्यांचे भीषण अत्याचार
तालिबान्यांनी या परिसराचा कब्जा घेतल्यानंतर लष्करी कारवाई होईपर्यंत दोन वर्षे हा परिसर त्यांच्याच अधिपत्याखाली होता. तालिबान्यांची राजवट असताना त्यांनी लोकांना जाहीररीत्या फासावर लटकावले, महिलांना निर्दय मारहाण करण्यात आली. अनेक कारखाने लुटण्यात आले. त्यामुळे कामगारवर्गाने तेथून पलायनच केले. पाकिस्तानी तालिबान्यांच्या काळात ३० कारखाने पूर्णपणे नष्ट करण्यात आले. काही कारखान्यांचे मालक बॉम्बहल्ल्यात थेट ठार झाले तर काहीजणांना निर्दयपणे लुटण्यात आले. आता परिस्थिती काहीशी बदलल्यानंतर काही मालकांनी कराची, लाहोर येथे धाव घेतली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
स्वातमधील रेशमी कापड व्यवसाय अतिरेक्यांकडून उद्ध्वस्त
स्वात खोरे हा परिसर अतिशय निसर्गरम्य..सदाबहार हरित पर्वतीय परिसराने नटलेला, ‘पाकिस्तानचे स्वित्झर्लण्ड’ अशीही त्याची ओळख.

First published on: 07-03-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swats silk industry killed by taliban terrorism