scorecardresearch

मानवी उत्क्रांतीतील शोधाचा सन्मान ;  स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्रातले नोबेल

‘‘नामशेष झालेल्या आपल्या पूर्वजांपैकी एकाचा म्हणजे ‘निअँडरथल्स’चा आनुवंशिक ‘कोडं’ उलगडण्याचे अशक्यप्राय कार्य पाबो यांनी केले

मानवी उत्क्रांतीतील शोधाचा सन्मान ;  स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्रातले नोबेल
स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो

स्टॉकहोम : आधुनिक मनुष्याच्या रोगप्रतिकारक प्रणालीचे अत्यंत महत्त्वाचे अंतरंग समजून घेण्याबरोबरच त्याला त्याच्या नामशेष झालेल्या पूर्वजाच्या तुलनेत विलक्षण बनवणाऱ्या मानवी उत्क्रांतीतील शोधाबद्दल स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.

पाबो यांनी विकसित केलेल्या तंत्रांमुळे संशोधकांना आधुनिक मानव आणि ‘निअँडरथल्स’ व ‘डेनिसोव्हन्स’ या दोन नष्ट झालेल्या मानवी प्रजातींच्या जनुकाचा तुलनात्मक अभ्यास करता आला, असे नोबेल समितीने म्हटले आहे. ‘निअँडरथल्स’ ही मानवाची एक स्वतंत्र प्रजाती होती. ४० हजार वर्षांपूर्वी नामशेष होईपर्यंत ती हजारो वर्षांपासून युरोपमध्ये अस्तित्वात होती. ‘‘नामशेष झालेल्या आपल्या पूर्वजांपैकी एकाचा म्हणजे ‘निअँडरथल्स’चा आनुवंशिक ‘कोडं’ उलगडण्याचे अशक्यप्राय कार्य पाबो यांनी केले. त्यांच्या कार्याने मानवी उत्क्रांतीचा इतिहास आणि मानव पृथ्वीतलावर कसा भ्रमण करीत गेला, हे शोधण्यातही मदत झाली, अशा शब्दांत नोबेल समितीने पाबो यांचा गौरव केला. पाबो आणि त्यांच्या संशोधकांच्या पथकाला हेही आढळले की, जनुकांचा प्रवास निअँडरथल्सपासून होमो सेपियन्सपर्यंत झाला होता. तसेच या दोन्ही प्रजातींच्या सहअस्तित्वाच्या काळात त्यांना एकमेकांपासून मुलेही झाली होती, असे पाबो यांच्या संशोधनातील निष्कर्ष असल्याचे नोबेल समितीच्या अध्यक्ष अ‍ॅना वेडेल यांनी सांगितले. होमिनिन प्रजातींमधील जनुकांचे हे हस्तांतरण करोना विषाणूसारख्या संसर्गानंतर आधुनिक मानवाची प्रतिकार प्रणाली कशी काम करते, हेही दाखवता येते, असेही नोबेल समितीने म्हटले आहे.

नामशेष झालेल्या मानवसदृश (होमिनिन्स) प्रजाती आजचा मनुष्य यांच्यातील आनुवंशिक फरक पाबो यांनी शोधला. त्यांच्या शोधांमुळे आपण आधुनिक मानव म्हणून कसे अनन्यसाधारण ठरतो, याचा शोध घेता येतो. तसेच आपला अज्ञात नातेवाईक ‘डेनिसोव्हन्स’ शोधण्याचा अद्वितीय पराक्रमही पाबो यांनी केला, असेही नोबेल समितीने म्हटले आहे. प्रा. स्वान्ते पाबो यांना जाहीर झालेल्या नोबेल पारितोषिकाचे स्वरूप आठ लाख युरो असे आहे.

आपण कोठून आलो आणि आपले पूर्वज नामशेष होत असताना, आपण (होमो सेपियन्स) अन्य मानवी उपजातींपेक्षा पृथ्वीवर वंश टिकवून ठेवण्यात आपल्याला कसे यश आले, अशा काही मूलभूत प्रश्नांच्या केंद्रस्थानी अनुवंशशास्त्रज्ञ पाबो यांचे कार्य आहे.

नामशेष झालेल्या मानवी प्रजाती आणि आधुनिक मानव यांच्यातील दुवा शोधण्यासाठी निअँडरथल या मानवी प्रजातीच्या जनुकांना क्रमबद्ध करण्याचे कार्य पाबो यांच्या प्रमुख कामगिरीपैकी एक आहे. सैबेरियात सापडलेल्या मानवी बोटाच्या हाडाच्या ४० हजार वर्षे जुन्या तुकडय़ावरून पाबो यांनी ‘डेनिसोव्हन्स’ या अज्ञात मानवी प्रजातीचे अस्तित्व प्रकाशात आणले.

४० हजार वर्षांपूर्वीच्या बोटाचे हाड..

’मानवी उत्पत्तीतील अतिशय महत्त्वाची घटना २००८ मध्ये घडली. सैबेरियातील डेनिसोव्हा गुहेत शास्त्रज्ञांना ४० हजार वर्षांपूर्वीचे बोटाचे हाड सापडले.

’पाबो यांनी त्याच्या ‘डीएनए’च्या नमुन्याची क्रमवारी लावली आणि तो ‘डीएनए’ अज्ञात ‘होमिनिन’चा होता. यावर प्रकाश टाकला. ‘होमिनिन’ना डेनिसोव्हन्स म्हणून ओळखले जाते.

’दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांतील ६ टक्के लोकांचा डीएनए ‘डेनिसोव्हन’ आहे. यावरून होमो सेपियन्सदेखील ‘डेनिसोव्हन्स’ यांच्याशी प्रजनन संबंध करीत असत, असे अनुमान काढता येते.

वडिलांचा वारसा

प्रा. पाबो यांनी आपले वडील सुने बर्गस्ट्रॉम यांच्या पावलावर पाऊल टाकून नोबेल पारितोषिक जिंकले. सुने बर्गस्ट्रॉम यांना १९८२ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. जेव्हा होमो सेपियन्स आफ्रिकेतून अन्य पसरत गेले तेव्हा युरेशियामध्ये ‘होमिनिन’चे दोन वेगळे गट (निअँडरथल्स आणि डेनिसोव्हन्स) वास्तव्य करीत होते. वेगाने पसरलेल्या ‘होमो सेपियन्स’ या आधुनिक मानवांशी स्पर्धा करताना निअँडरथल्स आणि डेनिसोव्हन्स यांचा टिकाव न शकल्याने या दोन्ही प्रजाती नष्ट झाल्या असाव्या असे बर्गस्ट्रॉम यांचे संशोधन होते.

नामशेष झालेल्या आपल्या पूर्वजांपैकी एकाचा म्हणजे ‘निअँडरथल्स’चा आनुवंशिक ‘कोडं’ उलगडण्याचे अशक्यप्राय कार्य पाबो यांनी केले. त्यांच्या कार्याने मानवी उत्क्रांतीचा इतिहास आणि मानव पृथ्वीतलावर कसा भ्रमण करीत गेला, हे शोधण्यातही मदत झाली.

नोबेल निवड समिती

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या