नवीन वर्षांत देशामध्ये  ६७३ जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेले असून १० हजार जणांना त्याची लागण झाली आहे.
  राजस्थानात गेल्या २४ तासांत स्वाइन फ्लूने आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून एच१ एन१ विषाणूने यावर्षी तेथे १८३ बळी घेतले आहेत, वैद्यकीय व आरोग्य संचालनालयाने म्हटले आहे की, १ जानेवारीपासून किमान ३३०२ रुग्ण या विषाणूने बाधित असल्याचे दिसून आले आहे. जयपूरमध्ये सर्वाधिक ३१ बळी गेले असून अजमेर २५, जोधपूर २०, नागौर १८, बारमेर १५, कोटा ९,  सिकर व चित्तोडगड प्रत्येकी ७ याप्रमाणे लोक मरण पावले आहेत. बन्सवारा ६, भिलवाडा, टोंक, बिकानेर, दौसा व झुंजनू, पाली प्रत्येकी ४ याप्रमाणे लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर ठिकाणी १ ते ३ मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्रात ७९ बळी
महाराष्ट्रात स्वाइन फ्लूने ७९ वर बळी घेतले असून नागपुरात ३० तर मुंबईत १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ५६९ जणांना या रोगाची लागण झाली आहे. देशातही या रोगाचे प्रमाण मोठे असून ती राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तेलंगणात स्वाइन फ्लूचे ४६ बळी गेले आहेत व १३ नवीन रुग्ण सापडले आहेत. १७ फेब्रुवारीपर्यंत एकूण ३४६९ जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. काल १२४ नमुने तपासण्यात आले त्यातील तीस जणांना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले आहे. कोलकात्याच्या वृत्तानुसार स्वाइन फ्लूचे ४२ रुग्ण सापडले असून त्यातील सहा नवीन आहेत. गेल्या २४ तासांत कुणीही मरण पावलेले नाही. राज्यात नवीन वर्षांत दोघांचा मृत्यू झाला आहे.