परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची भारत सरकारच्या वतीने चौकशी सुरू असून स्विस सरकारने मंगळवारी एका नव्या भारतीय कंपनीचे नाव जाहीर केले. इंदूरस्थित वस्त्रोद्योग कंपनी निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. या कंपनीबाबतची माहिती देण्याची विनंती भारत सरकारने केली असल्याचे स्विस अधिकाऱ्यांनी सांगितले.
निओ कॉर्प ही १९८५ मध्ये छोटी कंपनी सुरू करण्यात आली आणि आता ती बहुराष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग समूह असल्याचा दावा केला जात आहे. कर चुकविल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या विविध संकुलांवर छापे टाकले होते.
भारत आणि स्वित्र्झलडमध्ये प्रशासकीय सहाय आणि माहितीची देवाणघेवाण याबाबतचा करार करण्यात आला असून त्याचा एक भाग म्हणून भारताने विविध कंपन्या आणि व्यक्ती यांच्याबद्दलची सविस्तर माहिती मागितली आहे. स्विस सरकारच्या अधिकृत पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव नव्याने आले आहे.