लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरु आहे. काही ठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच काही ठिकाणी २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. देशात लोकसभेसाठी एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अशातच ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
म्हैसूर येथील काँग्रेसचे नेते डॉ. सुश्रुत गौडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ते म्हैसूर लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा होती. यानंतर अखेर डॉ. सुश्रुत गौडा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये ते सहभागी झाले होते.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर गंभीर आरोप; म्हणाले, “इंदिरा गांधींची संपत्ती मिळवण्यासाठी…”
राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत काश्मीरपर्यंत चालले
खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमध्ये डॉ. सुश्रुत गौडा हे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत त्यांच्याबरोबर होते. तसेच त्यांच्याकडे कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीसपदाची जबाबदारीही सोपवण्यात आलेली होती. मात्र, डॉ. सुश्रुत गौडा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
या प्रवेशासंदर्भात बोलताना डॉ. सुश्रुत गौडा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ‘व्हिजन आणि मिशन’वर प्रेरित होऊन आपण हा निर्णय घेतला आहे”, असे डॉ. सुश्रुत गौडा यांनी सांगितले. तसेच ‘लोकांची सेवा करणे हे आपले ध्येय असून माझे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पक्ष आहे’, असेही ते म्हणाले.