स्वित्झर्लंडमध्ये एका माथेफिरुने विजेवर चालणाऱ्या करवतीने भररस्त्यात पाच जणांवर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून घटनास्थळावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
स्वित्झर्लंडमधील शाफहाउजन येथे एका माथेफिरुने वीज किंवा बॅटरीवर चालणाऱ्या करवतीने दुकानदारांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोराने शाफहाउजनमधील ओल्ड सिटीमधील बाजारातील एका इमारतीमध्ये प्रवेश केला. त्याने दुकानदार आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांवर करवतीने हल्ला केला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. हा दहशतवादी हल्ला नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र हल्लेखोराविषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. हल्लेखोर फॉक्सवॅगन कारमधून बाजारात आला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या हल्ल्याचे नेमके कारण काय याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराची ओळख पटली असून त्याला अटक केल्यानंतरच सविस्तर माहिती देऊ असे पोलीस प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.