ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी चाकूहल्ला होण्याची घटना घडली आहे. यावेली सिडनीच्या एका चर्चमध्ये माथेफिरूने बिशप आणि इतर अनुयायांवर थेट हल्ला चढविला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चर्चमध्ये प्रार्थना सुरू असतानाच माथेफिरूने बिशपवर चाकू हल्ला करताना दिसतो. अचानक झालेल्या या हल्ल्यात बिशपसह अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिडनीच्या पोलिसांनी सांगतिले की, हल्लेखोराला तात्काळ अटक करण्यात आले आहे. दोन दिवसांआधी मॉलमध्ये झालेल्या हल्ल्यात सहा लोकांचा मृत्यू झाला होता.

पश्चिम सिडनीमध्ये वेकले येथील द गुड शेफर्ड चर्चमध्ये हल्ल्याची घटना घडली. ऑस्ट्रेलियातील सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या बातमीनुसार, स्थानिक वेळेनुसार सोमवारी रात्री प्रार्थनेच्या वेळी ही घटना घडली. प्रार्थनेचे थेट प्रक्षेपण सुरू असल्यामुळे या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. चर्चमधील बिशप प्रार्थना घेत असताना हल्लेखोर धावत त्यांच्यासमोर येऊन चाकू हल्ला करतो. त्यानंतर इतर लोक बिशप यांची सुटका करण्यासाठी धाव घेतात. त्यावेळी हल्लेखोराच्या चाकूमुळे इतरांनाही जखमा झाल्या.

सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेतले असून हल्लेखोर तपासात सहकार्य करत आहे.

शनिवारी झालेल्या चाकू हल्ल्यात सहा लोकांचा मृत्यू

शनिवारी सिडनीतील एका वर्दळीच्या शॉपिंग सेंटरमध्ये सहा जणांना चाकूने भोसकून ठार करण्याची घटना घडली. वेस्टफील्ड शॉपिंग सेंटरमध्ये शनिवारी दुपारी हल्ला करणाऱ्या आरोपीला महिला पोलिसाने गोळ्या घालून जागीच ठार केले होते. प्रत्यक्षदर्शींनी या हल्ल्याचा थरार माध्यमांसमोर सांगितला. तसेच न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी अनेक जखमींना वाचवले असल्याचे लोकांनी सांगितले.