Taliban bans chess in Afghanistan over Islamic law gambling concerns : भारतासह जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये बुद्धिबळ हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. या खेळाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान तालिबान सरकारने मात्र अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे. जुगार हा इस्लामिक कायद्यांनुसार निषिद्ध मानला जातो आणि या खेळामुळे जुगाराला प्रोत्साहन मिळू शकते, अशी चिंता व्यक्त करत ही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी घालण्यात आलेले हे निर्बंध धार्मिक अधिकारी बुद्धिबळ इस्लामिक मुल्यांशी सुसंगत असल्याचे निश्चित करत नाहीत, तोपर्यंत असणार आहेत.
“जोपर्यंत त्या मुद्द्यांकडे लक्ष्य दिले जात नाही, तोपर्यंत अफगाणिस्तानमध्ये बुद्धिबळाचा खेळ बंद करण्यात आला आहे,” असे तालिबानच्या क्रीडा संचालनालयाचे प्रवक्ते अटल माशवानी यांनी एएफपीशी बोलताना सांगितले.
काबूलमध्ये मनोरंजन म्हणून छोट्या सामाजिक केंद्रांमध्ये बुद्धिबळाचा खेळ खेळला जात असे. आता प्रशासनाने बंदी घालल्याने अशा केंद्रांना मोठा धक्का बसला आहे. शहरात एक कॅफे चालवणारे अजीजुल्लाह गुलजादा हे अनेक वर्षांपासून बुद्धिबळाच्या अनौपचारिक खेळांचे आयोजन करत आले आहेत. ते म्हणाले की, या निर्णयामुळे त्यांच्या व्यवसायाला, तसेच त्यांच्याकडे येणार्या लोकांच्या मानसिक आरोग्याला मोठा धक्का बसू शकतो.
“सध्याच्या काळात तरुणाकडे करायला फारसे काही नाही, त्यामुळे अनेक जण दररोज येथे येतात,” असे गुलजादा यांनी एएफपीला सांगितले. तसेच त्यांनी या ठिकाणी जुगार खेळला जात नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच इतर अनेक मुस्लिम बहुल देशांमधअये बुद्धिबळ मोठ्या प्रमाणात खेळले जाते असेही त्यांनी नमूद केले.
अजून कोणत्या खेळांवर बंधने?
२०२१ मध्ये सत्तेत आल्यानंतर तालिबानने कालांतराने हळूहळू कठोर कायदे लागू केले आहेत. गेल्या वर्षी तालिबान प्रशासनाने प्रोफेशनल मिक्स्ड मार्शल आर्ट्स (एमएमए) स्पर्धांवर बंदी घातली आहे. हा खेळ खूप हिंसक असून शरीयामध्ये बसत नाही असे सांगण्यात आले होते. तसेच तालिबान राजवटीत महिलांना खेळांमधून जवळपास पूर्णपणे वगळण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय संस्था आणि मानवाधिकार गटांनी वारंवार याचा निषेध केला आहे.
बुद्धिबळावरील बंदी कधी हटवली जाईल याबद्दल अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. हा खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्या धार्मिक अटी पूर्ण कराव्या लागतील याबद्दलही तालीबानने कोणतीही माहिती दिलेली नाही.