अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्याचं नाव जवळजवळ निश्चित केलं आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंड यांना देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी बसवलं जाणार आहे. तसेच दोन उपपंतप्रधानही नियुक्त करण्यात येणार असून मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची या पदांवर वर्णी लागणार आहे. सुत्रांनी सीएनएन-न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार मुल्ला अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंड यांचे नाव या पदासाठी सुचवलं आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमधील प्रत्येक माहिती जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमांना देणारा जबीउल्लाह मुजाहिदीन हा अखुंड यांचा अधिकृत प्रवक्ता म्हणून काम करणार आहे.

नक्की वाचा >> तालिबानला युनायडेट नेशन्सकडून मोठा दिलासा

सिराज जुद्दीन हक्कानीकडे अफगाणिस्तानच्या गृहमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात येणार आहे. हक्कानीच सर्व राज्यपालांची नावं निश्चित करणार आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचं काम झाल्याचं सांगण्यात येतं आहे. हक्कानीला सरकारची मोट बांधण्यासाठी फैज यांनी मदत केल्याचं सांगण्यात येते. तालिबान आणि अफगाणिस्तान लष्करामधील संघर्षामध्ये लष्कराचं फार नुकसान झालं. आयएसआयने हक्कानी नेटवर्कला सुरक्षा पुरवल्याचं सांगितलं जातं. हक्कानी हा अलकायदाशी संबंध असणारा गट आहे. संयुक्त राष्ट्रांबरोबरच अमेरिकेनेही हक्कानी गटाला दहशतवादी गट म्हणून जाहीर केलं आहे.

नक्की वाचा >> “…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रलायाचं नेतृत्व मुल्ला अमीर खान मुत्ताकींकडे सोपवण्यात येणार आहे. हे सरकार सध्या कार्यवाहक पद्धतीचं सरकार असणार आहे. तालिबानच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये सरकारची घोषणा केली जाईल. पंजशीरवरही तालिबानने ताबा मिळवल्याचा दावा केला जात आहे. तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि तालिबानविरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करीत होते. या दोघांनाही तझाकिस्तानमध्ये पळ काढल्याचं सांगण्यात येतं. एनआरएफच्या नेता असणाऱ्या मसूदने पंजशीरमध्ये अजूनही युद्ध सुरु असल्याचा दावा केलाय.

नक्की वाचा >> तालिबानमधील तरुण पॉर्न वेबसाइट्सवरुन तयार करतायत Kill List; जाणून घ्या काय आहे प्रकरण

द न्यूजच्या वृत्तानुसार मुल्ला मोहम्मद हसन अखुंड हे रहबारी शूरा या गटाचे प्रमुख आहेत. तालिबान जे निर्णय घेतं त्यामागे असणाऱ्या परिषदेला रहबारी शूरा असं म्हटलं जातं. त्याच परिषदेचे अखुंड हे प्रमुख नेते आहेत. अखुंड यांचा जन्म कंदहारमध्ये झाला असून नंतर ते तालिबानच्या सशस्त्र लढाईचं नेतृत्व करणाऱ्या गटाच्या सहसंस्थापकांपैकी एक होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी रविवारी काबूलमध्ये माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हिमतयार यांची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील अफगाण न्यूज पोर्टलने दिलेलेया माहितीनुसार सरकार कसं बनवायचं यासंदर्भातील चर्चेसाठी ही बैठक घेण्यात आलेली. याच बैठकीमध्ये बरादर आणि  तालिबानचा सर्वोच्च नेता हिबातुल्लाह अखुंदजादा यांच्याऐवजी अखुंड यांना प्रमुख नेता म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. अखुंड हे इतर नेत्यांपेक्षा कमी प्रभावशाली असल्याने तो तालिबानच्या इशाऱ्यावर काम करतील अशा अपेक्षेने ही निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> एक फोटो आणि नाव… जगाला एवढीच ओळख असणारा ‘तालिबान’चा म्होरक्या आणि त्याच्याबद्दलचं गूढ

तालिबानने १६ ऑगस्ट रोजी काबूलमधील राष्ट्राध्यक्षाच्या राजवाड्यात प्रवेश करुन संपूर्ण देशावर कब्जा मिळवला. काबूलमधील या नाट्यमय घडामोडीनंतर तालिबानची मित्रराष्ट्र आणि विरोध दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हापासूनच सर्व सहकारी पक्षांना एकत्र घेऊन सरकार बनवण्याचा प्रयत्न तालिबानकडून सुरु आहे.