अमेरिका व भारत हे पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील कृतींवर लक्ष ठेवून आहेत, असे भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले. तालिबानशी आतापर्यंत जो मर्यादित संपर्क आला आहे त्यानुसार अफगाणिस्तानातील तालिबानी राज्यकर्त्यांनी भारताच्या चिंता दूर करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमच्या प्रमाणेच अमेरिकाही पाकिस्तानच्या कृतीवर लक्ष ठेवून आहे असे त्यांनी वॉशिंग्टन येथे भारतीय वार्ताहरांना सांगितले. अमेरिकेचे धोरण थांबा व वाट पाहा असे असून अफगाणिस्तानात कशी परिस्थिती निर्माण होते यावर त्यांचे लक्ष आहे. भारताचे धोरणही तसेच असले तरी त्याचा अर्थ भारत कुठलीच कृती करीत नाही असा होता नाही. अफगाणिस्तानातील परिस्थिती ही अतिशय अस्थिर असून तेथे काय बदल होतात यावर आमचे लक्ष आहे असे त्यांनी स्पष्ट केले. तालिबानशी आमचा मर्यादित संपर्क आहे. याचा अर्थ पूर्ण संवाद आहे अशातला भाग नाही. पण जे काही संभाषण त्यांच्या नेत्यांशी आतापर्यंत झाले आहे त्यावरून तरी तालिबानने भारताला वाटत असलेल्या चिंता दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताच्या राजदूतांनी अलीकडेच कतारमधील दोहा येथे तालिबानी नेत्यांची भेट घेतली होती, त्याला अनुसरून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. अफगाणिस्तानच्या भूमीतून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले आहे, त्याचे ते पालन करतील अशी अपेक्षा आहे. सध्या शृंगला हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांनी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली होती.

दरम्यान, तालिबानचे अफगाणिस्तानातील नवीन सरकार हे खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक असेल व त्यात विविध समुदायांना प्रतिनिधित्व देण्यात येईल, तसेच दहशतवादाचा मुकाबला करून महिला व अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित राखले जातील, अशी अपेक्षा अँटनी ब्लिंकन यांनी व्यक्त केली आहे.