6-year-old Afghan girl forced to marry 45-year-old : अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या स्थितीबद्दल वारंवार विचलित करणाऱ्या बातम्या पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा भीषण प्रकार समोर आला आहे. येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने एका सहा वर्षीय मुलीबरोबर लग्न केल्याची घटना प्रकार अफगाणीस्तानमधील हेल्मंड प्रांतात घडली. अमेरिकेतील आउटलेट Amu.tv ने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार समोर आल्यानंतर तालिबानने त्या संबंधित व्यक्तीला त्या मुलीला घरी घेऊन जाण्यापासून रोखलं. मात्र त्यांनी मुलगी ९ वर्षांची झाल्यानंतर तिला तिच्या पतीच्या घरी घेऊन जाता येईल, असे सांगितल्याची बाब समोर आली आहे.
हा प्रकारानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र असे असले तरी हे लग्न अद्याप कायम आहे आणि वयाची नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला तिच्या पतीबरोबर जावे लागणार आहे.
हश्त-ए-सुब्ह वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीला आधिच्या दोन बायका आहेत आणि या व्यक्तीने या मुलीच्या बदल्यात तिच्या कुटुंबाला पैसे दिले. यानंतर सोहळा मारजाह जिल्ह्यात पार पडला. नंतर त्या मुलीचे वडील आणि नवरदेवाला अटक देखील करण्यात आली. पण या दोघांपैकी एकावरही आरोप ठेवण्यात आले नाहीत.
२०२१ साली सत्तेत आल्यापासून तालिबानकडून कमी वयात आणि बळजबरीने होणार्या वाढ झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये बालविवाह खूप मोठ्या प्रमाणात होतात, यात तालिबानने महिलांचे शिक्षण आणि नोकरी करण्यावर बंदी घातल्याने त्याच्यामध्ये अधिकच वृद्धी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यून वुमनच्या अहवालानुसार, या निर्बंधांमुळे देशभरात बालविवाहांमध्ये २५ टक्के वाढ झाली आहे आणि बाळंतपणात ४५ टक्के वाढ झाली आहे. UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, जगातीरल सर्वाधिक संख्येने बालवधू असलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तानाचा समावेश आहे.
इंटरनॅशनल क्रिमीनल कोर्टाने तालिबानच्या दोन वरिष्ठांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे, त्यांच्यावर अफगाणिस्तानात महिलांना आणि मुलींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीसाठी मानवतेच्या विरोधात गुन्हे केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कोर्टाने म्हटले की, तालिबानने सत्ता मिळवल्यापासून महिला आणि मुलींवरील अत्याचाराला सर्वोच्च नेते हैबतुल्लाह अखुंदजादा आणि मुख्य न्यायाधीश अब्दुल हाकिम हक्कानी हे जबाबदार आहेत असे मानण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. मात्र तालिबानने आम्ही आयसीसीला मान्यता देत नाहीत म्हणत हे आरोप फेटाळून लावले आणि हे वॉरंट म्हणजे जगभरातील मुस्लिमांचा आरोप असल्याचे म्हटले आहे.
या सर्वा गोष्टींदरम्यान अधघिकारांठी लढणारे कार्यकर्ते मात्र बाल विवाहामुळे मुलींवर होणाऱ्या भीषण परिणामांबद्दल माहिती दिली आहे. यामुळे त्यांनी कमी वयात आई होणं, शारीरिक तसेच लैंगिक छळ, नैराश्य आणि सामाजिक एकटेपणा अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. येथे कधी आणि कोणाशी लग्न करायचे याबद्दल मुलींच्या मताला कसलीही किंमत दिली जात नाही. अनेक मुलींना त्यांच्या जन्माच्या वेळीत ‘नामकरण (Naming) ‘ नावाच्या प्रथेद्वारे चुलत भावांच्या नावे केले जाते, हे पुरूष नंतर त्या मुलींना त्यांच्या फॅमिली प्रॉपर्टीप्रमाणे वागवतात. विशेष म्हणजे या प्रथा अंतिम मानल्या जातात आणि त्या मोडल्या जाऊ शकत नाहीत.
सध्या अफगाणीस्तानमध्ये मुलीचे लग्न करण्यासाठी किमान वयाची मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. तालिबान राजवटीने पुर्वीचा सिव्हील कोड लागू केलेला नाही, ज्यामध्ये मुलीच्या लग्नासाठी कायदेशीर वयाची अट ही १६ वर्ष होती. त्याएवजी लग्न हे इस्लामिक कायद्यांच्या व्याख्येनुसार केले जाते. हनाफी न्याय प्रणालीनुसार मुलगी तारुण्यवस्थेत पोहोचल्यानंतर लग्नासाठी पात्र असते.
अफगाणिस्तानात महिलांवर अनेक बंधने
तालिबानच्या राजवटीत मुलींवर बंधने ही फक्त लग्नापुरती नाहीत तर मुलींना माध्यमिक शाळा, विद्यापीठे, पार्क , जीम आणि पब्लिक बाथ या सर्व ठिकाणी प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बहुतांश नोकऱ्या महिलांसाठी नाहीत, सोबत पुरुष नसेल तर महिलांना प्रवास करण्याची बंदी आहे. तसेच त्यांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकून घ्यावा लागतो.