तालिबाने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानच्या कोणत्याही शहरात आता काय चित्र असेल याची कल्पना करता येत नाही. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येऊन महिना उलटलाय आणि परिस्थिती सामान्य होत आहे. मात्र, इथल्या रस्त्यांवर जागोजागी तुम्हाला AK-47 आणि M16 असॉल्ट रायफल्स घेऊन फिरणारे तालिबानी सैनिक आढळतील. असे बरेच तालिबानी सैनिक आहेत, जे ग्रामीण भागातील असून काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच शहरात आले आहेत. यातल्या काही तालिबान्यांना काबुल शहरातील प्राणीसंग्रहालयांवर लक्ष ठेवण्याचं काम दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काबुल प्राणीसंग्रहालयामध्ये AK-47 आणि M16 असॉल्ट रायफल्स घेऊन फिरणारे तालिबानी इथं सहलीसाठी येणाऱ्या कुटुंबीयांसोबत मिसळताना दिसत आहेत. ग्रामीण अफगाणिस्तानातील अनेक युवा तालिबानी सैनिकांसाठी प्राणीसंग्रहालय आणि शहर हा नवीन अनुभव आहे. इथं फिरायला येणारे लोक एखादी सावली बघून बसतात, आइस्क्रीम आणि डाळिंबांचा आस्वाद घेतात. याच दरम्यान देखरेखीचं काम बघणारे बंदुकधारी तालिबानी सिंह, बिबट्या, उंट, लांडगे, शहामृग आणि माकड यांना ठेवलेल्या ठिकाणांमध्ये घुसत आहेत.

वर्षानुवर्षे ग्रामीण भागातील लढाईनंतर तालिबान्यांनी राजधानी काबूल काबीज केली आहे. पहिल्यांदाच या तालिबान्यांनी एवढं मोठं शहर पाहिलंय. त्यामुळे हे तालिबानी प्राणीसंग्रहालयात सेल्फी घेऊन ग्रुप फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो सशस्त्र तालिबानी सैनिक रस्त्यांवर निघतात. त्यापैकी बरेच जण शस्त्रांशिवाय आणि पारंपारिक टोपी, पगडी, शालशिवाय देखील बाहेर फिरत असतात. डोळ्यांच्या मेकअपमुळे काही तालिबानी अफगाण लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

तालिबानचा ४० वर्षीय सदस्य अब्दुल कादिर आता गृहमंत्रालयासाठी काम करतो. तो म्हणतो, “मी इथे आल्यानंतर पुरुष मित्रांसोबत प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जातोय. मला प्राणी खूप आवडतात, विशेषत: जे आमच्या देशात आढळतात ते. सिंह आवडता प्राणी आहे,” असंही तो सांगतो. शस्त्रे घेऊन येण्याबाबत विचारले असता तो म्हणाला की, “मुलं किंवा महिला घाबरू नयेत म्हणून कार्यक्रमस्थळी बंदुका वापरण्यात येऊ नये, असं तालिबानला वाटतं.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban soldiers cradling ak 47 and m16 assault rifles mingle among families at kabul zoo hrc
First published on: 19-09-2021 at 14:03 IST