तालिबानचा सध्या बेपत्ता असलेला नेता मुल्ला महंमद उमर हा जिवंत असून तो पाकिस्तानात कराची शहरामध्ये लपला आहे असे अफगाणिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पाश्चिमात्य गुप्तचरांनीही तो कराचीतच असल्याचे म्हटले आहे.
मुल्ला उमर जिवंत आहे की नाही याबाबत बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात होत्या परंतु कराचीत आहे असे अफगाणिस्तानचे गुप्तचर प्रमुख रहमतुल्ला नाबिल यांनी सांगितल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे.एका युरोपीय अधिकाऱ्याने सांगितले की, मुल्ला उमर जिवंत असल्याबाबत अफगाणिस्तानच्या तिन्ही सुरक्षा दलांचे एकमत आहे. तो जिवंतच आहे असे नव्हे तर तो कराचीत आहे व कुठे आहे हे आम्हाला माहीत आहे असा दावा अफगाणी गुप्तचरांनी केला आहे. एकमेकांना ओळखणाऱ्या खेडय़ातील मुल्लांच्या गोतावळ्यात तो असतो. तालिबानच्या अनेक गटांना तो रसद पुरवठा करतो. आता मुल्ला अख्तर महंमद मन्सूर हा तालिबानचा दोन क्रमांकाचा नेता झाला असून त्याचे मुल्ला उमरशी संबंध आहेत अजूनही मुल्ला उमरच पडद्यामागून सूत्रे हलवित आहे असे नबील यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात अलीकडेच तालिबानने पेशावर येथे एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात १४८ जण ठार झाले होते.