‘अण्णा द्रमुक’चे नेते टी.टी.व्ही दिनकरन आणि मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. सोमवारी तामिळनाडूतील विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी दिनकरन समर्थक आमदारांना अपात्र ठरवले. १८ आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले असून या निर्णयावरुन विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आमचे संख्याबळ कमी करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असा आरोप दिनकरन यांनी केला आहे.

अण्णाद्रमुकचे नेते आणि शशिकला यांचे पुतणे दिनकरन यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामींवर गंभीर आरोप केले होते. खाणमाफियांशी पलानीस्वामींचे संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पलानीस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन नव्या विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी बैठक बोलवावी, आमदारच नवीन मुख्यमंत्री ठरवतील असे दिनकरन यांनी रविवारी म्हटले होते. शशिकला यांच्यामुळेच मुख्यमंत्रीपद मिळाले हे लक्षात ठेवा असेही त्यांनी पलानीस्वामी यांना सुनावले होते.

पलानीस्वामींना आव्हान देणाऱ्या दिनकरन यांना सोमवारी हादरा बसला. तामिळनाडू विधानसभा अध्यक्षांनी १८ आमदारांना अपात्र ठरवले. हे सर्व आमदार दिनकरन यांचे समर्थक होते. विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. दिनकरन गटातील बहुसंख्य आमदारांनी या नोटीशीली उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आली असे समजते.

तामिळनाडू विधानसभेत २३४ जागा असून जयललिता यांच्या निधनानंतर आर के नगर मतसंघातील जागा रिक्त आहे. बहुमतासाठी सरकारला ११७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. पलानीस्वामींकडे ११३ आमदारांचा पाठिंबा आहे. तर विरोधी पक्षांकडे ११९ आमदारांचे संख्याबळ होते. यात डीएमकेचे ८९, काँग्रेसचे ८, अण्णाद्रमुकमधील दिनकरन गटातील २१ आणि अन्य पक्षातील एका आमदाराचा समावेश होता. आता दिनकरन गटातील १८ आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने विरोधी पक्षांचे संख्याबळ घटले. आता विधानसभेत २१५ आमदार असून बहुमतासाठी १०८ ची मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. सत्ताधारी पलानीस्वामी यांना हा आकडा आता गाठता येणार आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या कारवाईवर दिनकरन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचे संख्याबळ कमी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ असे त्यांनी म्हटले आहे.