देशातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपयांची मदत करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये या योजनेमध्ये घोटाळा करणाऱ्या १६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये कुड्डालोर, तिरुवन्नामलाई, विल्लुपुरम, सलेम, कल्लाकुरिची या जिल्ह्यांमध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान या योजनेसाठी पात्र नसतानाही ४० हजार जणांना त्याअंतर्गत पैशांचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे ४० हजार जण दर वर्षी सहा हजार रुपयांचा लाभ घेत असल्याचे उघड झालं आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीयोजनेअंतर्गत वर्षातून तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे वाटप करण्यात येते. मात्र यामध्ये गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी अपात्र लोकांनाच मदत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या योजनेअंतर्गत फसवणूक होत असल्याची माहिती अंदाजे वर्षभरापूर्वी पहिल्यांदा समोर आली होती. कुड्डालोर येथील जिल्हाधिकारी असणाऱ्या चंद्रशेखर सखामुराई यांनी पिलाईयारमेडू गावातील काही शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतानाही त्यांचे नाव या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या यादीमध्ये असल्याचे निदर्शनास आणून दिलं होतं. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते असं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या तपासामध्ये कृषि विभागाच्या सह निर्देशकांनी आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये अशाप्रकारच्या फसवणुकीची अनेक प्रकरण असल्याची कबुली दिली. त्यानंतर सरकारने सीबीसीआयडीकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. राज्यामधील भाजपा शेतकरी मोर्चाचे उपाध्यक्ष असणाऱ्या सुरेंद्र रेड्डी यांनी चुकीची माहिती आणि खोटे पुरावे सादर करुन पात्र नसलेले लोकं या गोष्टींचा लाभ घेत असल्याचा आरोप केला आहे. खोट्या लाभार्थींच्या खात्यावर १० कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत देण्यात आल्याचा कबुली एका अधिकाऱ्याने दिली. यापैकी दीड कोटी रुपये पुन्हा सरकारच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत.

या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्यांपैकी अनेकजण हे सलेम जिल्ह्यातील थारामंगलम येथील आहेत. या लोकांनी शेतकरी नसणाऱ्यांनाही आपल्या कंप्युटर सेंटरच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यास मदत केली. केवळ सालेम जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचे १४ हजार बोगस लाभार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार बोगस लाभार्थी असल्याचे समजते. याशिवाय या प्रकरणामध्ये ५१ इतर लोकांचीही ओळख पटवण्यात आली आहे. यामध्ये कृषी विभागाचे कर्मचारी के. राजासारख्या व्यक्तींचाही समावेश आहे. के. राजाला निलंबित करण्यात आलं आहे. त्याचबरोबरच सलेम कृषी विभागाचे सह निर्देशक इलानगोवान यांची बदली करण्यात आली आहे.

या घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरु असल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनिसामी यांनी तिरुवल्लूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच दहा हजारहून अधिक बोगस लाभार्थींना या योजनेचा फायदा मिळाल्याची माहिती समोर येणं धक्कादायक आहे, असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamil nadu crores siphoned off pm kisan scheme scsg
First published on: 08-09-2020 at 11:24 IST