कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायाधीश चिन्नास्वामी स्वामिनाथन कर्नन यांना अखेर अटक करण्यात आली आहे. कोईमतूरमधून त्यांना अटक करण्यात आली असून त्यांचे वकील पीटर रमेश यांनीदेखील अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात वादग्रस्त विधान केल्याने कर्नन अडचणीत आले होते.

कोलकाता हायकोर्टात न्यायाधीश म्हणून कार्यरत असताना सी एस कर्नन यांनी वादग्रस्त आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टातल्या आठ वरिष्ठ न्यायाधीशांना तुरूंगात टाकले जावे असा विचित्र निर्णय त्यांनी दिला होता. यावर सुप्रीम कोर्टाने कर्नन यांच्या मानसिक स्वास्थ्याची तपासणी केली जावी असं म्हटले होतं. पण त्यालाही कर्नन बधले नाहीत आणि त्यांनी आपली विचित्र वर्तणूक सुरूच ठेवल्यानेच सुप्रीम कोर्टाने अखेर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली होती. सुप्रीम कोर्टाने कर्नन यांना सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. १० मेपासून कर्नन पसार झाले होते. १२ जूनरोजी ते निवृत्तही झाले होते. निवृत्तीच्या वेळी पसार असलेले कर्नन हे पहिले न्यायाधीश ठरले होते. मंगळवारी संध्याकाळी कर्नन यांना कोईमतूरमधून अटक केल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायमूर्ती भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत कर्नन यांनी खळबळ उडवून दिली होती. तसेच दलित असल्यामुळेच आपली कोंडी होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीश कर्नन यांनी सुप्रीम कोर्टासमोर लोटांगण घातले होते. आपली शिक्षा मागे घेतली केली जावी यासाठी विनंती केली होती. मात्र यानंतरही त्यांना दिलासा मिळाला नव्हता. पश्चिम बंगाल पोलिसांच्या पथकाने कर्नन यांना अटक केली असून कर्नन यांच्या वकिलांनी अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.