भारतीय विमान क्षेत्रातील पुरूषांचे वर्चस्व असलेच्या अखेरच्या क्षेत्रातही एका महिलेने आता प्रवेश केला आहे. एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) पहिल्यांदाच एका महिला फायर फायटरची नियुक्ती केली आहे. तानिया सन्याल असे या पहिल्या महिला फायर फायटरचे नाव आहे. ती मुळची कोलकाताची असून लवकरच ती सेवेत रूजू होईल.

तानियाने वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिला एएआयच्या पूर्व क्षेत्रातील विमानतळांसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये कोलकाता, पाटणा, भुवनेश्वर, रायपूर, गया आणि रांचीचा समावेश आहे. कोलकाता प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यापैकी कोणत्याही एका विमानतळावर तिची नियुक्ती केली जाईल.

एअरपोर्ट्स अथॉरिटीकडे त्यांच्याकडे असलेल्या विमानतळांवर सध्या ३३१० फायर फायटर्स (अग्निशामक जवान) तैनात आहेत. कुठेही विमानाचे लँडिंग करताना तिथे अग्निशामक दलाची सेवा असणे सक्तीचे आहे. हे क्षेत्र केवळ पुरूषांसाठीच असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. एएआयचे अध्यक्ष गुरूप्रसाद महापात्रा म्हणाले की, नवीन विमानतळ सुरू होत असल्यामुळे आणि विस्तारामुळे आम्हाला फायर फायटर्सची कमतरता भासत आहे. महिलांनाही या क्षेत्रात प्रवेश देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि तसा नियमही बनवला. यामध्ये शारीरिक क्षमतांसाठी एक मापदंडही ठेवल्याचे ते म्हणाले.

मी अहमदाबाद महापालिकेच्या अग्निशामक दलातील नियमातही असेच बदल केले होते. आम्ही त्याच्या आधारावरच महिला फायर फायटर्सच्या नियुक्तीसाठी मापदंड ठरवले. एखादी महिला या क्षेत्रात रूजू होण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्यातही यात सातत्य राहील, असे महापात्रा म्हणाले.

पुरूष फायर फायटर्ससाठी १.६ मीटर किमान उंची आणि किमान ५० किलोग्रॅम वजन आवश्यक असते. महिला फायर फायटर्ससाठी आम्ही किमान वजन ४० किलोग्रॅम केले आणि उंचीची अटही कमी केली. महिला फायर फायटर्सला शारीरिक नियमांमध्ये जरी सूट देण्यात आली असली तरी काम मात्र पुरूषांप्रमाणेच असेल.

दरम्यान, तानियाने आपल्यासाठी ही अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे. मला नेहमी आव्हानात्मक काम करण्याची इच्छा होती, असे सांगत या क्षेत्रात येण्यासाठी कुटुंबीयांनी मोठे सहकार्य केल्याचेही ती म्हणाली.