वेल्समधील टाटा पोलाद प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जित होणाऱ्या धूलीकणांमुळे ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोर्ट टॅल्बोट येथील या प्रकल्पामुळे वाळत घातलेले कपडे त्वरेन सुकत असून, घराबाहेर खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर काळ्या धुळीचे थर जमलेले दिसत असल्याच्या तक्रारी मार्गम आणि तैबॅच येथील नागरिकांनी केल्या.
ब्रिटन एकीकडे उष्णतेच्या लाटेत पोळून निघत असतानाच प्रकल्पाच्या धुरांडय़ातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवामान अधिकच खराब होत आहे. काळे धूलीकण मोठय़ा प्रमाणावर उत्सर्जित होत असले तरी खराब हवामानामुळे नागरिकांना खिडक्या उघडय़ा ठेवणे भाग पडत असून त्यामुळे धूळ घरात येत आहे, असे रॉब जोन्स या लोकप्रतिनिधींनी सांगितले. कोरडय़ा हवामानामुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून, पाऊस आल्यास तीच धूळ खाली बसण्यास मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.
टाटा पोलाद प्रकल्पाच्या वतीने पर्यावरणसंदर्भात मंगळवारी चर्चा आयोजित केली होती आणि या बाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. काही तांत्रिक समस्या भेडसावत असल्या तरी त्या परिस्थितीवर मात केली जाईल, असे प्रकल्पाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशभरात शेकडो जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त असून उष्माघातामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे